तारळी धरणाचा दरवाजा सरकल्याने पाणी नदीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

तारळे - तारळी धरणाच्या तत्काळ दरवाजाचे (क्विक गेट) बॉनेट अचानक तुटल्याने पाण्याचा मोठा प्रवाह नदीपात्रात मिसळत आहे. या घटनेमुळे तारळी नदीत कृत्रिम पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने विभागात घबराट आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार समोर आला. 

तारळे - तारळी धरणाच्या तत्काळ दरवाजाचे (क्विक गेट) बॉनेट अचानक तुटल्याने पाण्याचा मोठा प्रवाह नदीपात्रात मिसळत आहे. या घटनेमुळे तारळी नदीत कृत्रिम पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने विभागात घबराट आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार समोर आला. 

या धरणाची साठवण क्षमता 5.85 टीएमसी आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या गळतीमुळे धरणाचे काम कायम चर्चेत राहिले. आज सकाळी अचानक नदीपत्रातील पाणीपातळी वाढल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाच्या भिंतीच्या दरवाजातून पाणी येत असल्याचे दिसले. कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्या पथकाने दुसरा आपत्कालीन (इमर्जन्सी) दरवाजा बंद करून पाण्याचा प्रवाह थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, सायंकाळी सहापर्यंत पाणी बंद करण्यात यश मिळाले नाही. सकाळी दहापासून प्रतिसेकंद सुमारे 400 क्‍युसेक इतक्‍या वेगाने पाणी धरणातून बाहेर पडत आहे. धरणात सकाळी 4.24 टीएमसी पाणीसाठा होता. तो संध्याकाळपर्यंत 4.22 इतका कमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

सभापती देवराज पाटील, प्रांताधिकारी सुचिता भिकाने, पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस निरीक्षक कुमार घाडगे आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

एस. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धरणाला पाणी सोडण्यासाठी एकूण तीन दरवाजे आहेत. त्यातील दोन नंबरच्या तत्काळ दरवाजाचे बॉनेट सरकले जाऊन पाण्याचा प्रवाह बाहेर पडत आहे. आपत्कालीन दरवाजा बंद करून पाण्याचा प्रवाह थांबवून प्रत्यक्षात तिथे पाहणी केल्याशिवाय निश्‍चित कशामुळे लिकेज झाले, हे कळणार नाही. पाणी थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असून धरणाला कोणताही धोका नाही. 

पाल यात्रा भरवण्यावर संकट 
चारच दिवसांवर पाल येथील श्री खंडोबाची यात्रा आहे. व्यापाऱ्यांनी आज वाळवंटात दुकाने लावायला सुरवात केली असतानाच नदीचे पाणी वाढू लागले. पाल यात्रा समितीच्या वतीने दुकाने घालण्याचे काम थांबविण्यात आले. नदीपात्रात बनविण्यात येणारा मिरवणूक मार्ग पाण्याने वाहून गेला आहे. लवकर पाणी थांबविले नाही, तर पाल यात्रेवर टांगती तलवार आहे.

Web Title: Tarali dam eventually broke the door

टॅग्स