पेट्रोल पंपांवर मापात पाप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

ठाणे - शहरातील वागळे इस्टेट परिसरातील पेट्रोल पंपावर यंत्रातील मायक्रो चिपद्वारे होणारी फसवणूक उघड केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर आजपासून छापे टाकण्यास सुरवात केली. या कारवाईत काही पेट्रोल पंप संशयास्पद आढळले आहेत. यामधील काही बंद करण्यात आले. 

ठाणे गुन्हे शाखेच्या चार पथकांनी विविध पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक उघड केली आहे. या इंधन फसवणुकीचे धागेदोरे उत्तर प्रदेशात आहेत. 

ठाणे - शहरातील वागळे इस्टेट परिसरातील पेट्रोल पंपावर यंत्रातील मायक्रो चिपद्वारे होणारी फसवणूक उघड केल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यातील विविध पेट्रोल पंपांवर आजपासून छापे टाकण्यास सुरवात केली. या कारवाईत काही पेट्रोल पंप संशयास्पद आढळले आहेत. यामधील काही बंद करण्यात आले. 

ठाणे गुन्हे शाखेच्या चार पथकांनी विविध पेट्रोल पंपांवर ग्राहकांची फसवणूक उघड केली आहे. या इंधन फसवणुकीचे धागेदोरे उत्तर प्रदेशात आहेत. 

पेट्रोल वितरण करणाऱ्या यंत्रामध्ये तांत्रिक फेरफार करून त्यामध्ये मायक्रोचीप बसवून नागरिकांनी मागितलेल्या पेट्रोलपेक्षा कमी पेट्रोल देऊन फसवणुकीचा प्रकार उत्तर प्रदेशमधील विशेष टास्क फोर्सकडून उघड करण्यात आला होता. यामध्ये डोंबिवलीच्या दोन जणांचा समावेश आहे. त्यांची अटक ठाणे पोलिसांच्या मदतीने करण्यात आली होती. त्या वेळी ठाणे पोलिसांनी महाराष्ट्रामध्येही अशा प्रकारची पेट्रोलचोरी होण्याची शक्‍यता व्यक्त करून त्या दृष्टीने तपास सुरू केला. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 16 नंबरच्या पेट्रोल पंपावर छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला होता. गेली अनेक वर्षे हा पेट्रोल पंपचालक ग्राहकांचे पेट्रोल चोरून त्याची विक्री करत असल्याचे पोलिसांकडून समोर आल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन पेट्रोल पंपावर चोरीचे प्रात्यक्षिकही पाहिले. 

पुणे, रायगडातही छापे... 

ठाणे पोलिसांनी पुणे हडपसर, रायगडमधील खोपोली येथे प्रत्येकी एका आणि भिवंडीतील कोनगाव येथील दोन पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात आले. कोनगावातून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तसेच कोनगावात एका पेट्रोल पंपावर 5 लिटर मागे 700 ते 400 मिलिलिटर कमी इंधन देत आल्याचे निष्पन्न झाले आहे. ते पेट्रोप पंप सील करण्यात आले आहे. येथील मशिनमध्ये विशिष्ट चिप बसविलेली पोलिसांना आढळली. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, या कारवाईसाठी पोलिसांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणांचीही मदत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पंपाच्या पल्सरमध्ये हेराफेरी... 

पेट्रोल पंपाच्या यंत्रामध्ये पल्सर नामक यंत्र असून त्यामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देण्याचा प्रयत्न पेट्रोलमाफियांकडून केला जात होता. ठाणे पोलिसाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने डोंबिवलीतील पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री कारवाई करून एकाला अटक केली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ठाण्यातील वागळे इस्टेटमधील इंडियन ऑइलच्या ऐकी ऑटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर छापा टाकला. या वेळी पोलिसांनी येथे प्रसारमाध्यमांना प्रात्यक्षिक दाखवले. त्या वेळी येथील मशिनमधून प्रत्येक 5 लिटरमागे 200 मिलिलिटर पेट्रोल कमी दिले जात असल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले. त्यानुसार ते पेट्रोल पंप सील करून तेथील मॅनेजरच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.