आता लढा बहुपत्नीकत्वाविरुद्ध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाकची पद्धत घटनाबाह्य ठरविली आणि शायरा बानो पुन्हा चर्चेत आल्या. तोंडी तलाकविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करणाऱ्यांपैकी शायरा बानो एक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी केलेली बातचीत. 

निकालावर तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम काय होती? 
 माझ्यासाठी आणि सर्व मुस्लिम महिलांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. सुधारणांच्या वाटेवरील हा मैलाचा दगड ठरणार आहे. 

अशा संवदेनशील मुद्यावर याचिका दाखल करण्याचे धैर्य कसे दाखविले? 
 ही २०१५ मधील घटना आहे. मी उत्तराखंडमधील काशीपूर येथे राहत होते. माझ्या पतीने मला स्पीडपोस्टने तलाकनामा पाठविला. मला दोन मुलांचे संगोपन करावयाचे असल्याने मी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ढकलले गेले. मी कुटुंबीयांच्या मदतीवर कसेतरी घर चालविले. त्यानंतर मात्र मी न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतला. मला अनेक जणांनी पाठिंबा दिला. माझा भाऊ अर्शद माझ्या कायम पाठीशी होता. मला तो दिल्लीला घेऊन आला. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील वकील बालाजी श्रीनिवासन यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्‍वासन दिले. 

तुमचे पुढचे पाऊल काय होते? 
तोंडी तलाक घटनाबाह्य असल्याचे ठरवून तो बंद करावा, या मागणीसाठी वकिलांच्या मदतीने मी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल याबद्दल मला आत्मविश्‍वास होता. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लिम महिला मान उंचावू शकतील का? 
ही अतिशय मोठी घटना आहे. कोणाच्याही लहरीप्रमाणे मुस्लिम महिलांना घराबाहेर पाठवता येणार नाही; परंतु सुधारणांचा मार्ग अजून खूप लांब आहे. बहुपत्नीत्व आणि निकाल हलाला याविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे.
 
या गैरप्रथांविरोधात न्यायालयात जाणार का? 
बहुपत्नीकत्वाविरोधात मी निश्‍चितच न्यायालयात दाद मागणार. प्रेषितांनी तोंडी तलाकला पाठिंबा दिला नव्हता; परंतु ही प्रथा सुरूच ठेवावी, असे कोणीतरी म्हटले होते. अशा विधानांनी आमच्या निश्‍चयाला धक्का बसणार नाही. लोकांना अशा गैरप्रथांविरोधात बोलायला हवे. 

या निकालानंतर तुमच्या आयुष्यात काही बदल दिसतो का? 
आता माझ्या दोन मुलांचा ताबा मिळविण्यासाठी मी लढणार आहे. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणी मी याचिका दाखल केली आहे. मी व्यवस्थापन शाखेची पदवीधर आहे. मी आता नोकरी स्वीकारून मुस्लिम महिलांचे हक्क आणि प्रतिष्ठेसाठी लढा सुरूच ठेवणार आहे. माझ्या मुलीला अशा प्रकारच्या अनुभवातून जावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. 

कायदेशीर लढाईत कोणत्याही संघटनेने दबाव आणला का? 
कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचे मी ठरविले होते. एकदा माझ्या वकिलांना मुस्लिम संघटनांनी काहीही बदलणार नसून, तुमची अप्रतिष्ठा होईल, असे सांगितले होते. माझे वकीलही त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

------------------------------------------------------------------

तलाक आणि मुस्लिम महिलांचे प्रश्‍न
एकाच बैठकीत सलग तीनदा पतीने ‘तलाक’ असा शब्द उच्चारला की, विवाह संपुष्टात येतो, अशी ही पद्धत आहे. कुरआनमध्ये तोंडी तलाकचा उल्लेख नाही, ही पद्धत खलिफा उमर यांनी सुरू केली आणि नंतर ती रूढ झाली. मुस्लिम महिलांचा ‘तलाक-ए-बिद्दत’ला विरोध आहे, ‘तलाक-ए-सुन्नाह’चा अंगीकार करावा, असे त्यांना वाटते. पती, पत्नी यांच्यात टप्प्या-टप्प्याने समेट घडावा, अशी अपेक्षा कुरआनमध्ये व्यक्त केलेली आहे. त्याकरता दीर्घकालीन पद्धतीही सांगितली आहे. त्यातून मार्ग नाही निघाला तर उभयतांकडील कुटुंबीयांनी एकत्रित येऊन तोडगा काढावा, असे म्हटले आहे. एवढे करूनही जर तोडगा नाही निघाला तर पतीला घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे, अशा प्रकारे मुभा दिलेली आहे. 

इतर महत्त्वाचे खटले
शमीम आरा विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात २००२ मध्ये न्या. आर. सी. लाहोटी यांनी तोंडी तलाक अवैध ठरवला होता. त्या वेळी त्यांनी अशा तलाकसाठी योग्य पार्श्‍वभूमी गरजेची आहे, असे मत व्यक्त केले होते. तसेच, तलाक देण्यापूर्वी दोन मध्यस्थ नेमायला पाहिजे होते, जेणेकरून ते उभयतांमधील घटस्फोट टाळण्यासाठी प्रयत्न करतील, असे मतही न्यायालयाने नोंदवले होते. 

२००२ मध्येच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दगडू पठाण विरुद्ध रहीमबी खटल्यात तोंडी तलाक अवैध ठरवताना कुराणचा दाखला दिला होता. 

जगातील चित्र
जगातील अनेक मुस्लिम देशांनी तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीला बंदी घातलेली आहे. 
पाकिस्तान आणि बांगलादेशात १९६१ पासूनच तोंडी तलाकवर बंदी आहे 
ट्युनिशियात न्यायालयाबाहेर घटस्फोट मान्यच नाही 
अल्जेरियात घटस्फोट हा केवळ न्यायालयाच्या संमतीनेच होतो 
मलेशियात घटस्फोटापूर्वी काझी किंवा मध्यस्थामार्फत तो टाळण्याचे प्रयत्न केले जातात. 
एका दमात तीनदा तलाक म्हणण्याच्या पद्धतीला मोरोक्को, अफगाणिस्तान, जॉर्डन, कुवेतमध्ये मान्यता नाही.

भारतातील चित्र 
ब्रिटिश काळापासून येथील मुस्लिमांचे व्यवहार शरिया किंवा इस्लामी न्यायव्यवस्थेनुसार चालतात 

असा होतो तलाकचा वापर
तोंडी तलाक देणे ही प्रचलित पद्धती असली तरी, आता या समाजात पत्राने, मोबाईलवर मेसेज, ई-मेल पाठवून, वॉटस्‌ॲप्सवरही तलाक कळवला जात आहे 
६५.९टक्के मुस्लिम महिलांना तोंडी तलाक दिला जातो 
७.६ टक्के मुस्लिम महिलांना पत्राद्वारे तलाक दिला 
३.४ टक्के मुस्लिम महिलांना फोनद्वारे तलाक दिलेला आहे 
०.८ टक्के महिलांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे तलाक दिलेला आहे 
२२.३ टक्के महिलांना अन्य मार्गांनीही तलाक दिलेला आहे. 

या महिलांनी दिला लढा
शायरा बानो, काशीपूर, जि. उधमसिंगनगर ः ३५व्या वर्षी, विवाहाला १५ वर्षे झाल्यानंतर दोन अपत्ये पदरात असताना तलाक दिला गेला
आफरीन रेहमान, जयपूर ः २०१४ मध्ये विवाहबद्ध झाल्यावर काही महिन्यांतच सासरच्यांनी त्रास दिल्याने माहेरी आली, स्पीडपोस्ट टपालाने पतीने घटस्फोट दिला 
गुलशन प्रवीण, रामपूर, उत्तर प्रदेश ः एप्रिल २०१३ मध्ये विवाहानंतर अपत्य झाले, दोन वर्षे सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ. २०१५ मध्ये माहेरी असताना पतीने दहा रुपयांच्या स्टॅंप पेपरवर तलाकनामा पाठवून दिला 
इशरत जहाँ, हावडा ः एकतीसवर्षीय इशरतच्या विवाहाला १५ वर्षे आणि पदरात चार मुले असताना पतीने एप्रिल २०१५ मध्ये दुबईहून फोनद्वारे तलाक दिला 
अतिया साबरी, सहारनपूर ः २०१२ मध्ये विवाहबद्ध झाल्यावर सासरच्यांनी २५ लाखांसाठी छळ आरंभला. तिने पोलिसांत तक्रार दिली. पतीने कागदावर तीनदा तलाक लिहून दिला.