तुरीचा दर घसरल्याने शेतकऱ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

हमीभावाचा आधार निसटला; अनेक जिल्ह्यांत आंदोलने
मुंबई - हमीभावाचा आधार निसटल्यामुळे लाखो क्विंटल तुरीसह शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले आहेत. राज्यभरातील खरेदी केंद्रांवर सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी करत विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी आज आंदोलन छेडले.

हमीभावाचा आधार निसटला; अनेक जिल्ह्यांत आंदोलने
मुंबई - हमीभावाचा आधार निसटल्यामुळे लाखो क्विंटल तुरीसह शेतकरी वाऱ्यावर सोडले गेले आहेत. राज्यभरातील खरेदी केंद्रांवर सरकारने तूर खरेदी करावी, अशी मागणी करत विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी आज आंदोलन छेडले.

सोमवारी बाजार उघडल्याबरोबर तुरीचे दर खाडकन कमी झाले. 5050 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असलेल्या तुरीची अनेक ठिकाणी 3600 ते 4000 रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केली. परिणामी शेतकऱ्यांना क्विंटलमागे हजार रुपयांचा फटका बसला आहे.

तूर खरेदी केंद्रांना दिलेली मुदतवाढ शनिवारी संपली आणि पुन्हा शेतकऱ्यांवर हतबलतेची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रांगेत असलेले शेतकरी आता नाईलाजाने मिळेल, त्या भावाने व्यापाऱ्यांकडे विक्री करीत आहेत. काही ठिकाणी हमी दराच्या खरेदी केंद्रांवर अजूनही शेतकरी आपली तूर घेऊन अपेक्षेने थांबलेले आहेत. एवढ्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही मोजमापासाठी नंबर न आल्याने व मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक असल्याने तूर उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत 90 बाजार समित्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. चालू हंगामात आतापर्यंत शेतकऱ्यांनी 2.10 लाख क्विंटल शेतमाल या योजनेअंतर्गत साठविला आहे. हा माल बाजार समितीच्या गोदामात ठेवून त्यावर केवळ 6 टक्‍के दराने तारण कर्ज घेता येईल. हा माल गोदामात साठविण्यासाठी शेतकऱ्याकडून कोणतेही भाडे आकारले जात नाही. या मालाचे संरक्षण व विम्याचा खर्च बाजार समितीमार्फत करण्यात येतो. शेतकऱ्यांनी गोदामात माल ठेवल्यास शेतकऱ्यांना त्याच दिवशी बाजार समितीकडून तुरीच्या बाजारभावाच्या 75 टक्‍के एवढी रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते. राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

बाजार समिती परिसरातील शिल्लक तूर
जिल्हा तूर (क्विंटलमध्ये)

औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड---सव्वादोन लाख
परभणी, हिंगोली---36,428
अकोला, बुलडाणा, वाशीम---दोन लाख

राज्यात 16 लाख टन तूर पडून
यंदा राज्यात तब्बल 20 लाख टनइतके तुरीचे उत्पादन झाले असताना नाफेडतर्फे आतापर्यंत केवळ 4 लाख टनाची खरेदी झाली आहे. याचा फायदा राज्यातील फक्‍त 2 लाख 58 हजार शेतकऱ्यांना झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तूर पडून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील तूर उत्पादन खालीलप्रमाणे
2016-17 - 20 लाख टन
2015-16 - 4 लाख 44 हजार 300 टन
2014-15 - 3 लाख 53 हजार 300 टन
2013-14 - 10 लाख 34 हजार 200 टन

यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्याससुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. शेतकऱ्यांचा विषय समोर आला, की परवानगी आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो आणि त्याचा फटका बळिराजाला सहन करावा लागतो.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

तुरीचे खरेदी केंद्र बंद, बारदाना नाही, माल साठवायला गोदाम नाहीत; मग सरकारने तूर खरेदीचे नियोजन तरी काय केले आहे? का फक्त झोपा काढल्या? राहिलेल्या सर्व तुरीची खरेदी करा, खरेदी केलेल्या तुरीला हमीभाव व क्विंटलला 500 रुपये बोनस द्या; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्व तुरीची खरेदी करणे सरकारला अशक्‍य आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी त्यांची तूर कमी भावाने बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा.
- सुभाष देशमुख, सहकार पणनमंत्री