संपूर्ण तंत्रज्ञानही मराठीत यावे - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, (डोंबिवली) - ""मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. त्यासाठी अन्य भाषांतील साहित्य मराठीत आणि मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषांत गेले पाहिजे. चीन, जपान आणि कोरियासारख्या देशांनी संपूर्ण तंत्रज्ञान आपापल्या भाषांत आणले, त्यामुळेच त्यांना प्रगती करणे शक्‍य झाले,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्‌घाटक म्हणून बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही आपल्याला मराठीतून देता आले पाहिजे, इतकी मराठी भाषा ज्ञानवाहिनी बनली पाहिजे, असे सांगितले. ""मराठीने इतर भाषांनाही समृद्ध केले आहे. त्यामुळे अनुवादातून आदान-प्रदान अधिक वाढले पाहिजे. ज्येष्ठ हिंदी लेखक विष्णू खरे यांनी अनुवादासाठी अकादमी सुरू करण्याची केलेली सूचना निश्‍चितच चांगली आहे. आचारसंहिता संपल्यावर आपण याचा नक्कीच विचार करू व त्यावर अंमलबजावणी करू. भालचंद्र नेमाडेंसारख्या दिग्गज लेखकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळण्यासाठी आपण आपले साहित्य जगभरातील भाषांत जावे, यासाठी अनुवादाचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक करू,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

""प्रगत शैक्षणिक धोरण आमच्या सरकारने आखल्यानंतर डिजिटायझेशनसारख्या उपक्रमांमुळे इंग्रजी शाळांत जाणाऱ्या सुमारे 15 हजार मुलांनी मराठी शाळांत प्रवेश घेतला. आनंददायी शिक्षणपद्धती आणल्यानंतर "लर्निंग आउटकम'मध्ये 18 वा असलेला महाराष्ट्र आज तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. संस्कृतीची शाश्‍वत मूल्ये कायम ठेवून बायोटेक्‍नॉलॉजीचा स्वीकार मराठीने केला पाहिजे,'' असे ते म्हणाले.
नवीन पिढीच्या बदललेल्या संवाद व अभिव्यक्तीच्या माध्यमांकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले, ""पुस्तके असलीच पाहिजेत; पण साहित्याने "ऍप"वरही झेप घेतली पाहिजे. त्यातून सकस साहित्य तरुण पिढीला आकर्षित करेल. साहित्य बहुजनांपर्यंत, वंचितांपर्यंत पोचले पाहिजे. त्यासाठी अभिव्यक्तीला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे.''

Web Title: The whole technology might Marathi - CM