पंढरपूरच्या महिलेची सौदी अरेबियातून सुखरूप सुटका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पंढरपूर - कामाच्या शोधात सौदी अरेबिया येथे जाऊन तिथे अडचणीत सापडलेली येथील रिझवाना खैरादी ही महिला बुधवारी (ता. 12) भारतात सुखरूप परतली. भारतीय दूतावास, परराष्ट्र सेवेतील सचिव ज्ञानेश्‍वर मुळे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नामुळे कोणताही त्रास न होता खैरादी यांना पंढरपूरला आपल्या कुटुंबाकडे परत येता आले. 

पंढरपूर - कामाच्या शोधात सौदी अरेबिया येथे जाऊन तिथे अडचणीत सापडलेली येथील रिझवाना खैरादी ही महिला बुधवारी (ता. 12) भारतात सुखरूप परतली. भारतीय दूतावास, परराष्ट्र सेवेतील सचिव ज्ञानेश्‍वर मुळे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नामुळे कोणताही त्रास न होता खैरादी यांना पंढरपूरला आपल्या कुटुंबाकडे परत येता आले. 

कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे येथील संत पेठ भागात राहणाऱ्या रिझवाना खैरादी (वय 50) यांनी सौदी अरेबियात जाऊन घरकाम करून कुटुंबासाठी पैसे मिळवण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथील एजंटमार्फत त्या सौदीमध्ये गेल्या होत्या. तेथे त्यांना ज्या घरात काम मिळाले होते, तेथील काम वाढल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी फोनवरून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तेथे त्रास होत असल्याने सुटका करण्याची विनंती केली होती. परंतु, भारतात लगेच परत जायचे असल्यास कराराचा भंग केल्यामुळे आधी तीन लाख 60 हजार भरा मगच परत जा, अशी भूमिका तेथील घरमालकिणीने घेतली होती. त्यानंतर त्यांनी खैरादी यांचा पासपोर्ट काढून घेऊन फोनवर बोलण्यास देखील मज्जाव केला. 

दरम्यान, खैरादी यांचा मुलगा जहीर यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिराज उबाळे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन त्यांना या प्रकाराची माहिती दिली. पिंगळे यांनी वरिष्ठांमार्फत परराष्ट्र विभागाला या घटनेची माहिती कळवली. त्याचवेळी जहीर यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना भेटून त्यांनाही या संदर्भात मदत करण्याची विनंती केली होती. परिचारक यांनी डॉ. अनिल जोशी यांच्यामार्फत त्यांचे स्नेही परराष्ट्र सेवेतील सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्याशी संपर्क साधला. मुळे यांनी खैरादी यांची कागदपत्रे मागवून ती सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाकडे पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. आमदार परिचारक यांनीही या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानंतर सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने खैरादी यांच्याशी संपर्क साधून त्यांना भारतात परत पाठवण्याविषयी प्रक्रिया सुरू केली. भारतीय दूतावासाच्या प्रयत्नामुळे संबंधित घरमालकाने खैरादी यांना त्यांचा पासपोर्ट परत केला व विमानाचे तिकीट काढून देऊन भारतात परत पाठवले. खैरादी घरी सुखरूप परत आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.