विज्ञान कळण्यासाठी इंग्रजीच कशाला पाहिजे?

अनिल गोरे
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

दहावी नंतरचे विज्ञान तसेच विज्ञानाधारित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच मराठी या प्रगत भाषेतून उपलब्ध झाले की मग महाराष्ट्रात विज्ञान आणि विज्ञानाघारित विद्याशाखांची पुन्हा जोमाने वाढ होऊ शकेल. 

1975 पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये आठवी ते दहावी दरम्यान गणित, विज्ञान विषय सक्तीचे झाले. 

विज्ञान शाखेकडे ओढा वाढला, देशातील सर्वाधिक इंजिनिअरिंग, संगणकशास्त्र शिक्षण महाराष्ट्रातील संस्थांत मिळू लागले. बहुसंख्य मुले मुली गणित, विज्ञान विषय मराठीतून शिकत होती, त्यांना या दोन विषयातील प्राथमिक संकल्पना उत्तम प्रकारे समजत होत्या. प्राथमिक संकल्पना नीट कळल्याने विज्ञान आधारित उच्चशिक्षणातील बारकावेही नीट कळत होते.

 

1990 नंतर मात्र या क्षेत्रात पोपटपंची युग अवतरले. बहुसंख्य पालकांना इंग्रजी माध्यमाचे व्यसन लागले. आपल्या मुलाबाळांनी गणित आणि विज्ञान सुरूवातीपासून इंग्रजीतून शिकावे ही भावना प्रबळ होत गेली. गणित, विज्ञान फ्रेंच, लॅटिन मधून शिकण्याची प्रभावी पद्धत थांबवून सर्वच विषय इंग्रजीतून शिकण्याची अशीच मोहीम 1860 पासून इंग्लंडमध्ये सुरू झाली होती. गणित, विज्ञान, विज्ञान आधारित  विषयांसाठी इंग्रजी हे भाषा माध्यम अयोग्य, अपुरे, क्लिष्ट असल्याने हळूहळू इंग्लंडमधील विद्यार्थी या विषयांत जगाच्या मागे पडू लागले. गणित, विज्ञानाचे आकलन व अभिव्यक्तीत इंग्लंडमधील विद्यार्थी सतत मागे पडल्याने गेल्या कित्येक दशकात, इंग्लंड जगाला नवी उत्पादने, नव्या प्रणाली, नवीन विचार पुरवू शकलेले नाही. बेरोजगारी, उत्पन्नात घट अशा समस्यांना इंग्लंड सध्या तोंड देत आहे.

गणित, विज्ञान इंग्रजीतूनच शिकण्याचे  व्यसन महाराष्ट्रातील पालकांमध्ये वाढू लागल्यावर असाच परिणाम महाराष्ट्रानर होऊ लागला. गणित, विज्ञान विषयातील प्राथमिक संकल्पना कळण्याचे प्रमाण शालेय पातळीवर घटू लागले. हे विषय शाळेत नीट न समजल्याने या विषयांच्या उच्चशिक्षणात विषय कळणे अधिकच कठीण होत गेले, पाठांतराच्या जीवावर कागदी पदव्या मिळवण्याचे प्रमाण वाढले. या पदव्या हातात घेऊन आलेले पदवीधर कारखाने, प्रकल्पांच्या कामकाजात प्रभावी ठरत नाहीत हे लक्षात आल्यावर अशा पदवीधरांना रोजगार मिळेनासा झाला.

 

सावध! ऐका पुढल्या हाका 

या न्यायाने गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात इंजिनिअरिंग, संगणकशास्त्र अभ्यासक्रमांचे प्रवेश घटू लागले. 70 हजार ते 90 हजार जागा रिकाम्या राहू लागल्या. गेल्या तीन चार वर्षात अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश महाराष्टात सर्वत्र घटू लागले. यावर्षी पुण्यात विक्रमच झाला. प्रवेशासाठी सात, आठ फेऱ्या राबवूनही विज्ञान शाखेत एकट्या पुणे शहरात साडेपाच हजार जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थी नाहीत. जागा रिकाम्या राहिल्या.

गणित, विज्ञान समजण्यास इंग्रजी अयोग्य अपुरी भाषा असतानाही त्याच भाषेतून हे दोन विषय शिकायचे व्यसन पालकांनी पुढे रेटल्याने मुलांना हे दोन विषय नीट समजले नाहीत, विज्ञान शाखेची नावडच निर्माण झाली. 1975 मध्ये मुलांना समजणारा गणित, विज्ञान विषयांतील बराच भाग, गेल्या वीस वर्षांत मुलांना समजत नाही (इंग्रजीतून शिकलेला कोणताही विषय न समजणे हा इंग्रजीचा अंगभूत म्हणजे generic गुणधर्मच आहे) म्हणून अभ्यासक्रमातून काढणे शिक्षण खात्याला भाग पडले. आता त्यामुळे तो भाग समजण्याची शक्यता मुळातूनच संपली. गणित आणि विज्ञान विषय शिकण्यासाठी इंग्रजी या मागास भाषेला माध्यम बनवण्याच्या व्यसनापोटी या दोन विषयांचेच शालेय पातळीवर प्रचंड खच्चीकरण झाले

 

इंग्रजी माध्यम शाळा आणि मराठी माध्यम शाळांमधील सेमी इंग्रजीचा खुळचट पर्याय बंद झाला की, विज्ञान शाखेची ही घसरण तात्पुरती थांबेल पण विज्ञान शाखेच्या वाढीसाठी केवळ इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाचा त्याग पुरेसा नाही तर पुढील उपायही आवश्यक आहे.

दहावी नंतरचे विज्ञान तसेच विज्ञानाधारित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच मराठी या प्रगत भाषेतून उपलब्ध झाले की मग महाराष्ट्रात विज्ञान आणि विज्ञानाघारित विद्याशाखांची पुन्हा जोमाने वाढ होऊ शकेल.