14 मेला राज्यात 'जेल भरो' आंदोलन करणार : रघुनाथ पाटील

सयाजी शेळके
मंगळवार, 24 एप्रिल 2018

राज्यातील ही संघटित गुन्हेगारांची टोळी असून, त्यांच्यावर मोक्का लावून गुन्हे दाखल करावेत. यासाठी येत्या 14 मे रोजी राज्यात सर्वत्र जेलभरो आंदोलन करण्यात येईल. 

- रघुनाथ पाटील, शेतकरी संघटनेचे नेते

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा नाही, उसाला एफआरपी द्यायची नाही. जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर लोटायचे. यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपाशिवाय काहीच करीत नाहीत. राज्यातील ही संघटित गुन्हेगारांची टोळी असून, त्यांच्यावर मोक्का लावून गुन्हे दाखल करावेत. यासाठी येत्या 14 मे रोजी राज्यात सर्वत्र जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. 

शहरात मंगळवारी (ता. २४) झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, किशोर ढमाले आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, देशात मुक्या प्राण्यांना मारल्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र देशात दररोज १२ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यावर कोणतीच उपायोजना नाही, कायदा नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र हा पॉलिसी मॅटर असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायलायानेही यावर अंतिम निर्णय दिला नाही. मुक्या प्राण्यांसाठी कायदा आहे, मग शेतकरी आत्महत्येसाठी कायदा का नाही, असा प्रश्‍नही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. 

शासनाच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यात सर्वत्र १४ मे रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वजण कुटुंबासह जेलमध्ये जायला तयार झाले आहेत. त्यामुळे शासनाला जेलही अपुरे पडतील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. कालिदास आपेट, किशोर ढमाले यांनीही यावेळी शासनाच्या धोरणावर टीका करीत जेलभरो आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Web Title: On 14th may will start Strike of Jail Bharo says Raghunath Patil