जलयुक्त शिवार गावांना राज्यस्तरावर २५ लाखांचे बक्षीस

हरी तुगावकर
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

जलसंधारणाची कामे करणाऱ्या गावांना शासनाचे पारितोषिकही

लातूर - राज्यभर सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आता राज्यस्तरावर पहिले २५ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा, विभाग व राज्य अशा तीन स्तरावर या गावांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. जलयुक्त शिवाराच्या कामात गावांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ही बक्षिसे दिली जाणार आहेत.

राज्यातील ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, पावसावर अवलंबून आहे. राज्यातील सिंचन क्षमतेवर मर्यादा आल्याने विविध स्रोतांद्वारे पाण्याचा पुरेपूर उपयोग केल्यास कमाल २८ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. कोरडवाहू क्षेत्रावर अवलंबून असलेल्या जनतेस अपुऱ्या पावसामुळे आर्थिक संकटास व पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. 

यासाठी राज्यातील कोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्यासाठी मृद्‌ व जलसंधारण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जमिनीची धूप थांबविणे, पाणलोटाच्या माथा ते पायथ्यामध्ये विविध उपचाराद्वारे भूगर्भातील पाणी वाढविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

यातूनच जलयुक्त शिवार ही योजना सुरू झाली आहे. यात आता गावांना बक्षिसे दिली जाणार आहेत.

राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, जिल्हास्तरावर पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार दिले जाणार आहेत. जिल्हास्तरावर प्रथम एक लाख, द्वितीय ७५ हजार, तृतीय ५० हजार, चौथे तीस हजार, पाचवे २० हजार रुपये गावांना, तालुक्‍यांसाठी प्रथम पाच लाख व दुसरे तीन लाख, विभागस्तरावर गावांसाठी प्रथम साडेसात लाख, द्वितीय पाच लाख, तालुक्‍यांसाठी प्रथम दहा लाख, द्वितीय साडेसात लाख, जिल्ह्यासाठी प्रथम १५ लाख व द्वितीय दहा लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. राज्यस्तरावर गावांसाठी प्रथम २५ लाख, द्वितीय १५ लाख, तृतीय साडेसात लाख, तालुक्‍यांसाठी प्रथम ३५ लाख, द्वितीय वीस लाख, तृतीय दहा लाख, जिल्ह्यांसाठी प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस १५ लाख रुपये दिले जाणार आहे.  राज्यस्तरावर वैयक्तिक (व्यक्ती किंवा शेतकरी) पुरस्कारात प्रथम ५० हजार व द्वितीय तीस हजार तर अशासकीय संस्थांचा सामुदायिक स्वरूपाच्या पुरस्कारात प्रथम एक लाख ५० हजार व द्वितीय एक लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे.