पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यापीठाला 50 लाख सुपूर्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार

दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार
नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19 वा दीक्षान्त समारंभ गेल्या महिन्यात पार पडला. या समारंभामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना डी. लीट. देऊन सन्मानित करण्यात आले होते. दीक्षान्त समारंभाच्या मनोगतप्रसंगी त्यांनी विद्यापीठाला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शनिवारी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्याकडे या रकमेचा धनादेश देण्यात आला.

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात आलेले हे 50 लाख रुपये बॅंकेत जमा करण्यात येणार आहेत. या व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून दरवर्षी महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, श्‍यामराव कदम आणि शारदाताई गोविंदराव पवार यांच्या नावाने प्रत्येकी दोन विषयांसाठी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला प्रकुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव बी. बी. पाटील, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मोहन खताळ आदी उपस्थित होते.
""या भागातील गोरगरीब, गुणवान विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शरद पवार यांच्या मुंबई येथील पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यापीठास 50 लाख रुपये दिले आहेत, असे आमदार काळे यांनी मनोगतात सांगितले. कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी शरद पवार यांचे आभार मानले आणि विद्यापीठासाठी ही एक ऐतिहासिक घटना आहे, असे सांगितले.

नांदेड - पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला 50 लाखांच्या देणगीचा धनादेश शनिवारी सुपूर्त करण्यात आला. या वेळी आमदार विक्रम काळे, डॉ. पंडित विद्यासागर आदी उपस्थित होते.