प्रकल्पांमध्ये 56 टक्केच पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

बीड - जिल्ह्यात 2 मोठे, 26 मध्यम आणि 126 लघु, असे एकूण 144 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व सिंचन प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 1135.23 दशलक्ष घनमीटर आहे. मागील पावसाळ्यात हे सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र अवैध पाणी उपशामुळे हा पाणीसाठा 100 टक्‍क्‍यांवरून आता 56 टक्‍क्‍यांवर आला आहे. चार महिन्यांत तब्बल 44 टक्के पाणी संपले आहे. 

बीड - जिल्ह्यात 2 मोठे, 26 मध्यम आणि 126 लघु, असे एकूण 144 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व सिंचन प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 1135.23 दशलक्ष घनमीटर आहे. मागील पावसाळ्यात हे सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र अवैध पाणी उपशामुळे हा पाणीसाठा 100 टक्‍क्‍यांवरून आता 56 टक्‍क्‍यांवर आला आहे. चार महिन्यांत तब्बल 44 टक्के पाणी संपले आहे. 

गेल्या काही वर्षांत पाऊस कमी झाल्याने मांजरा, बिंदुसरा यासारखे सिंचन प्रकल्प कोरडे पडले होते. दुष्काळीस्थितीत जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागला. त्यामुळे बीड शहराला आठ दिवसांआड, अंबाजोगाई शहराला पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात होता. वाड्या आणि वस्त्यांना तब्बल 470 टॅंकरच्या 1096 खेपा करून त्यांची तहान भागविण्यात आली. मात्र त्यानंतर मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या सव्वाशे टक्के पाऊस झाला. त्यामुळे दहा वर्षांनी मांजरा, माजलगाव, बिंदुसरा हे तलाव ओसंडून वाहिले. या तलावांचे दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. जिल्ह्यातील 144 सिंचन तलावांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. 

मात्र भयान दुष्काळाचा सामना केल्यानंतरही पाण्याचा जपून वापर करण्याबाबत दक्षता घेण्यात आली नाही. 

बेसुमार पाणी उपशामुळे जिल्ह्यात 44 टक्के पाणीसाठ्यात घट झाली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 56.48 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या सिंचन प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 1135.23 दशलक्ष घनमीटर आहे. त्या तुलनेत सध्या फक्त 501.932 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. मुबलक पाण्यामुळे यंदा ऊस लागवडीचे प्रमाणही वाढले आहे, यासाठी तलावांच्या पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच फळबागांसह गव्हालाही पाणी दिले जात आहे. सिंचन विभागाकडून रब्बी पिकांना पाणी पाळ्या सोडण्यात आल्यानेही काही प्रमाणात पाणीसाठा कमी झाला असला तरी अनधिकृत पाणी उपशामुळे जास्त प्रमाणात पाणी कमी झाले आहे. काही ठिकाणी थेट प्रकल्पात मोटारी टाकून पाण्याची पळवापळवी होत आहे. यावर प्रशासनाचा कुठलाही अंकुश राहिलेला नाही. यातच आगामी काळात उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने पाणीसाठ्याचा टक्का आणखी घसरण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लावण्याची वेळही येऊ शकते. 

12 प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली 
जिल्ह्यातील 144 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प सध्या कोरडेठाक पडले आहेत. 12 प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. याशिवाय 38 प्रकल्पांमध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. सद्यःस्थितीला 52 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 25 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान आहे. 36 प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 50 ते 75 टक्‍क्‍यांदरम्यान आहे. केवळ तीन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: 56 per cent of the water