जिल्हा परिषदेसाठी 598, तर पंचायत समितीसाठी 1216 अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.1) जिल्हा परिषदेच्या 62 गटांसाठी 598, तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी तब्बल 1216 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याने तहसील कार्यालयात उमेदवार, त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली होती.

औरंगाबाद - नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (ता.1) जिल्हा परिषदेच्या 62 गटांसाठी 598, तर नऊ पंचायत समित्यांच्या 124 गणांसाठी तब्बल 1216 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याने तहसील कार्यालयात उमेदवार, त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी झाली होती.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांचा उमेदवारांचा घोळ कायम राहिला, त्यामुळे शेवटच्या दिवशीच उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी उड्या पडल्या. सकाळी नऊपासून तहसील कार्यालयांमध्ये तोबा गर्दी झाली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 27 जानेवारीपासून सुरवात झाली होती. पहिल्या दिवशी गट, गणासाठी एकही अर्ज आला नव्हता. चौथ्या आणि पाचव्या दिवशी बोटावर मोजण्याइतके उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी मात्र उमेदवारांची झुंबड उडाली होती.

औरंगाबाद तहसील कार्यालयासमोर मंडप टाकून त्यामध्ये टेबल टाकण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक गट, गणासाठी गावांचे नाव घेतले जात होते. तसेच उमेदवारांनी रांगेत उभे राहून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजेची उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अडीच वाजेच्या सुमारासच उमेदवारांचे अगोदर अर्ज घेण्यात आले. त्यानंतर गट, गणानुसार उमेदवारांना प्राचारण करून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. औरंगाबाद तहसील कार्यालयात गर्दीवर नियंत्रण ठेवणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तर तहसील कार्यालयाच्या बाहेरील रोडवर दोन्ही बाजूंनी गाड्याच गाड्या होत्या.

गुरुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर त्याची छाननी गुरुवारी (ता.2) होणार आहे. छाननी झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार (ता.7) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख राहणार आहे. ज्यांनी न्यायालयात अपील दाखल केले नाहीत असे उमेदवार दहा फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतील.

जिल्हा परिषद 62 गट आणि पंचायत समितीच्या 124 गणांसाठी दाखल नामनिर्देशनपत्र
तालुके.............जिल्हा परिषद गटातील अर्ज..............पंचायत समितीसाठी अर्ज
सोयगाव.....................30........................................53
सिल्लोड...................23.........................................200
कन्नड......................96.........................................162
फुलंब्री......................29.......................................55
खुलताबाद...................40.......................................71
वैजापूर.......................68......................................116
गंगापूर.......................92.......................................178
औरंगाबाद.....................98......................................159
पैठण..........................122....................................222
एकूण.........................598.....................................1216