‘ऑरिक’मधील तलाव ठरणार एंटरटेनमेंट झोन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

औरंगाबाद - शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीची शोभा वाढविणाऱ्या तिसऱ्या तलाव उभारणीच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. औद्योगिक शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाने केवळ जलस्तर वाढणार नसून हा भाग एंटरटेनमेंट झोन म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

औरंगाबाद - शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीची शोभा वाढविणाऱ्या तिसऱ्या तलाव उभारणीच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. औद्योगिक शहराच्या मध्यभागी असलेल्या या तलावाने केवळ जलस्तर वाढणार नसून हा भाग एंटरटेनमेंट झोन म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

‘ऑरिक’मध्ये तिसऱ्या तलावाच्या उभारणीसाठीच्या निविदा ऑरिकच्या संकेतस्थळावर झळकल्या. लॅण्डस्केपिंगचा महत्त्वाचा भाग असलेल्या या मानवनिर्मित तलावाची उभारणी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. औरंगाबाद इंडस्ट्रीअल टाऊनशिप लिमिटेडच्या (एआयटीएल) वतीने करण्यात येणाऱ्या या कामासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे एआयटीएलच्या वतीने सांगण्यात आले. मंगळवारी (ता. १८) सुरू झालेली निविदा प्रक्रिया २९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ज्या कंपनीला हे काम मिळेल त्यांनी ‘लेटर ऑफ ॲलॉटमेंट’ मिळाल्यानंतर २०१ दिवसांत अर्थात सुमारे सात महिन्यांत हे काम पूर्ण करायचे बंधन घालण्यात आले आहे. याशिवाय उभारण्यात येणाऱ्या या तलावाची १८ महिने देखरेख उभारणी करणाऱ्या कंपनीला करावी लागणार आहे. ऑरिक येथील तलावांच्या उभारणीने या भागातील सौंदर्यात भर पडणार आहेच; पण या तलावातील पाण्याने येथील जलस्तर वाढविण्यासही मदत होणार आहे. या भागाच्या लॅण्डस्केपिंगसाठी एकूण ४३.५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यातून हे काम होणार आहे. लॅण्डस्केपिंगमध्ये रोड साइड प्लांटेशन, पब्लिक हॉलभोवतीचे सौंदर्यीकरण, ऑरिक हॉलभोवतीचे सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश राहणार आहे. 

दहा ठिकाणी होणार मास प्लांटेशन
ऑरिकमधील तयार करण्यात येणाऱ्या या तलावाचा आराखडा हा मुंबई आणि ऑस्ट्रेलियन कंपनीच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या तलावाच्या भोवताली हिरवळ लावण्यावर भर देण्यात येणार असून, यात दहा ठिकाणी ‘मास प्लांटेशन’ (झाडांची बेटे) तयार करण्यात येणार आहे. याशिवाय या परिसरात तयार करण्यात येणारी पार्किंगही हिरवळीने नटणार आहे. यामुळे या तलावाभोवतीचे सौंदर्य वाढणार आहे आणि परिसराला झळाळीही मिळणार आहे.  

पॉण्टॉन, किऑस्क आणि गझिबो
तलावाच्या उभारणीसाठीच्या कामासोबत या परिसराला एंटरटेनमेंट झोन म्हणून निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये पॉण्टॉन, किऑस्क आणि गझिबो या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. पॉण्टॉन (पाण्यात जाण्यासाठीचे तरंगणारे पूल), किऑस्क (विक्रीसाठीचे स्टॉल) आणि गझिबो (विश्रांती घेण्यासाठीचे झोपडीसारखे विश्रांतिगृह) यांची उभारणी करण्यात येणार आहे. 

प्ले एरिया आणि भटकंतीसाठी पाथ-वे
या तलावाभोवती असणाऱ्या सुविधांमध्ये मुलांसाठीच्या प्ले एरियाचा समावेश करण्यात आला आहे. या प्ले एरियालगत असलेल्या तिकीट काउंटरलगत उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांवर वीजनिर्मितीसाठी सोलार पॅनेल लावण्यात येणार आहेत. याशिवाय तलावाकाठी भटकंती करण्यासाठी पाथ-वेही तयार करण्यात येणार आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये..
प्ले एरियाचा समावेश (७२०८ चौरस मीटर)
मास प्लांटेशनच्या माध्यमातून हिरवागार परिसर
पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी स्पीलवे 
पाथवेच्या साहाय्याने तलावाभोवती भटकंती 
स्वच्छतागृहांवर सोलार पॅनेलने वीजनिर्मिती
पॉण्टॉन, किऑस्क आणि गझिबा