बहिणीचे लग्न अन्‌ भावाचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

जालना - बहिणीच्या लग्नाचे साहित्य खरेदीसाठी मित्रासोबत जाणाऱ्या भावाच्या दुचाकीस भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला; तर मित्र गंभीर जखमी झाला. उड्डाणपूल ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर मंगळवारी (ता. 28) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी या रस्त्यावरून होणारी ट्रक वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी दगडफेक केल्याने नूतन वसाहत भागात काही वेळ तणाव निर्माण झाला. 

पोलिस सूत्रांनी सांगितले, की येथील लहूजीनगर भागात राहणाऱ्या शमुवेल रतन पवार (वय 22) या युवकाच्या चुलत बहिणीचे लग्न दुपारी होते. लग्नाचे काही साहित्य आणण्यासाठी शमुवेल व त्याचा मित्र सुरेश नरहरी नेमाडे हे दोघे दुचाकीने नवीन जालन्यात जात होते. त्याच वेळी रेल्वे मालधक्‍क्‍यावरून रेल्वे उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या ट्रकने स्वर्ग हॉटेलसमोर समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शमुवेल जागीच ठार झाला, तर सुरेश गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. अपघातानंतर चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला. अपघातानंतर शमुवेलच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. जखमी सुरेश नेमाडे यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रकाश पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कॉंस्टेबल राजपूत करत आहेत. 

दगडफेकीमुळे तणाव 
या अपघाताच्या घटनेचे पडसाद नूतन वसाहत भागात उमटले. रेल्वे मालधक्‍क्‍यावरून बेदरकारपणे शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. रेल्वे मालधक्‍क्‍यावरून नूतन वसाहत मार्गे होणारी ट्रक वाहतूक तत्काळ बंद करावी, या मागणीसाठी काही युवकांनी एकत्र येऊन ट्रकवर दगडफेक केली. या भागातील दुकानेही नागरिकांनी बंद केली. त्यामुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांत करत, या भागात चोख बंदोबस्त लावला होता.

Web Title: Accidental death of brother