पाण्यासाठी हर्सूलच्या नागरिकांचा टाहो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

औरंगाबाद - हर्सूल तलावातून जुन्या शहरातील आठ वॉर्डांना पाणीपुरवठा केला जातो; मात्र या तलावाजवळच्या हर्सूल परिसरातील जवळपास सात-आठ वसाहतींना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. महापालिकेने सुरू केलेल्या टॅंकरचे दर येथील जनतेला परवडत नाहीत. पाणीटंचाई दूर करावी आणि टॅंकरचे वाढीव दर तत्काळ कमी करा असा या वसाहतींमधील नागरिकांनी टाहो फोडत शुक्रवारी (ता.17) महापालिकेच्या मुख्यालयावर हंडा मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाचे व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. महापौर भगवान घडामोडे यांच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हर्सूल परिसरातील भगतसिंगनगर, मोहिनीराजपुरम, अष्टविनायकनगर, आदित्यनगर, छत्रपतीनगर, सारा सिद्धी, माऊलीनगर हा परिसर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. या भागाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून नागरिक नियमितपणे कर भरतात. या भागात अद्यापही टॅंकरनेच पाणीपुरवठा केला जातो; मात्र टॅंकरच्या वेळा ठरलेल्या नाहीत. एक ड्रम पाण्यासाठी महिलांना ताटकळत बसावे लागते. विशेष म्हणजे टॅंकरचे दर वाढवून ते आता अकराशे रुपये केलेले आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये समांतर जलवाहिनी प्रकल्पांतर्गत इथे जलवाहिनी टाकण्यात आली; मात्र आता प्रकल्पाचेच भविष्य अधांतरी असल्याने नळाद्वारे कधी पाणी मिळेल हे सांगणे अवघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याच्या टॅंकरचे वाढविलेले दर कमी करावेत. ठरलेल्या दिवशी टॅंकरने तात्पुरता का होईना पाणीपुरवठा करावा.

याशिवाय हर्सूल ते पिसादेवी आणि अगस्ती शाळा ते भगतसिंगनगर रस्त्यावर जागोजागी खड्डे झाल्याने नागरिकांना पाठदुखीचा त्रास होत आहे. मागील वर्षी या रस्त्याचे काम झाले; मात्र पुन्हा महिनाभरातच रस्ता खचला. या रस्त्याचे कामही मार्गी लावावे, यासोबतच अन्य मूलभूत सोयीसुविधा द्याव्यात, या मागण्या मोर्चकऱ्यांनी केल्या. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांना भेटून निवेदन दिले. त्यांनी याप्रश्‍नी आपण लक्ष घालू, असे आश्‍वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मोर्चात वैजयंता मिसाळ, शांता आंबाडरे, शोभा जावळे, तारा मानकापे, शोभा ठाकूर, चंद्रकला साळवे, शामल भुजंग, आशा चव्हाण, मैनावती जाधव, श्रद्धा चौधरी, मनीषा चौधरी, कल्पना निकम, सुमन भोसले, शालिनी घुगे, निर्मला पोटलाशेरू यांच्यासह या वसाहतींमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: agitation for water