नोकरीऐवजी कृषी उद्योजक व्हा - डॉ. पंजाबसिंग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

परभणी - दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे मराठवाड्यातील पारंपरिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषतः "कृषी' च्या विद्यार्थ्यांनी निव्वळ नोकरीसाठी शिक्षण न घेता कृषी उद्योजक होऊन ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन झाशी येथील राणी लक्ष्मीबाई कृषी विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. पंजाबसिंग यांनी केले.

विद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ शनिवारी झाला. त्या वेळी प्रा. डॉ. पंजाबसिंग बोलत होते. कृषिमंत्री तथा प्रकुलपती पांडुरंग फुंडकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. सिंग म्हणाले, "कृषी विद्यापीठे हा देशाच्या कृषी विकासातील महत्त्वाचे स्रोत आहे. देश, जगातील सामाजिक-आर्थिक प्रगतीच्या वेगासोबत राहण्यासाठी कृषी विद्यापीठीय शैक्षणिक यंत्रणा सक्षम केली पाहिजे. हवामान बदल, नैसगिक आपत्ती, जमिनीची धूप, पाणीटंचाई, शेतमाल दरात चढउतार, जमिनीची टुकडे पद्धती, मजूर टंचाई, अजैविक तण, तापमानवृद्धी, अन्नद्रव्यांची कमतरता आदी समस्या सध्या उद्‌भवल्या आहेत. परिणामी, वाढीव शेती उत्पादकतेत शाश्‍वतता राखणे कठीण होत आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करून यावर उपाययोजना केल्या पाहिजेत. यासाठी माहिती, नॅनो, जैव तंत्रज्ञान, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर संशोधन, विकासासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.

मराठवाड्यातील शेती विकासासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यासाठी गावपातळीवर "वॉटर बजेट' संकल्पना राबवावी लागेल. पीक पद्धतीत बदल करावा लागेल. अल्पभूधारकांचा विचार करून प्रतिएकरी उत्पादकता वाढवावी लागेल. एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा लागेल. लहान शेतीसाठी योग्य यांत्रिकीकरणाचा आधार घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना पीक लागवडीत विविधता आणून पशुपालन, कृषी संलग्न जोडधंद्यांचा आधार घ्यावा लागेल.'

दरम्यान, विद्यापीठातील विद्याशाखांतील एकूण पाच हजार 643 जणांना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी प्रदान करण्यात आली.