राजकारणात कोंडी होताच अमितरावांना आठवले काका!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

औरंगाबाद : साहसी राजकारणात अपयशाच्या ठोकरा बसू लागल्यानंतर लातूरचे आमदार अमित देशमुख यांना आपले काका अर्थात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची आठवण झाली आहे. जिल्ह्यातल्या पालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्यावर आता महापालिका निवडणुका समोर आहेत. लातूर महापालिका म्हणजेच अमित देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे लातूर महापालिकेच्या निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. अस्तित्वाची ही लढाई जिंकायची तर ज्येष्ठ आणि अनुभवी दिलीपरावांचे मार्गदर्शन घेणे अपरिहार्य असल्याचे अमित देशमुख यांना पक्के कळून चुकले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कार्यक्रमानिमित्ताने नुकतेच एका व्यासपीठावर काका -पुतणे आले होते. यावेळी अमितराव यांनी आपले निर्णय चुकल्याची कबुलीच दिली. पण उत्साहाच्या भरात आपण काकांचे ऐकले नाही अशी खंत अमित यांनी व्यक्त केली. यापुढे कुठलेही महत्त्वाचे निर्णय काकांच्या सल्ल्याशिवाय घेणार नाही अशी ग्वाही अमितराव यांनी भरसभेत दिली.
दिलीपराव देशमुख यांनीही "सुबह का भुला शाम को घर लौटा ' या भावनेने दोघांमधल्या कटुतेवर पडदा टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दिलीपराव देशमुख यांनी विधानपरिषदेचे सदस्य या नात्याने प्रदीर्घ काळ काम केले त्यांना लातूरच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिलीपरावांना थोडेसे बाजूला करत अमितरावांना राजाकरणात उतरवल्यावर काका पुतण्यात सुप्त संघर्ष सुरू झाला होता. गेल्या 5-6 वर्षात काका- पुतण्याच्या संघर्षात अनेक चढ-उतार आले. मात्र दिलीपरावांनी घरातले मतभेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी संयम पाळला. अमित देशमुख यांनी आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी उभारताना विलासराव यांच्याबरोबर काम केलेल्या जिल्ह्यात आणि शहरातल्या ज्येष्ठ नेत्यांना दुखावले होते आता दिलीपरांवाबरोबरच्या मनोमिलनामुळे देशमुख गट एकदिलाने विरोधकांशी सामना करू शकेल.