एटीएमवर गोळीबार करून लुटीचा प्रयत्न!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

औरंगाबाद - पिस्टलचे नऊ एमएमचे दोन राउंड एटीएमवर फायर करून भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गंभीर घटना सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (ता. पाच) पहाटे तीनच्या सुमारास घडली. ही बाब दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.

औरंगाबाद - पिस्टलचे नऊ एमएमचे दोन राउंड एटीएमवर फायर करून भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही गंभीर घटना सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवरील पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (ता. पाच) पहाटे तीनच्या सुमारास घडली. ही बाब दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.

सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील एका पेट्रोलपंपालगत भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम आहे. या केंद्रात दुपारी बारा वाजता एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी आली. त्यावेळी एटीएमच्या लॉकरवर दोन राउंड फायर करण्यात आल्याचे दिसून आले. पहिल्या राउंडमध्ये एक कुलूप तुटले परंतु दुसऱ्या राउंडमध्ये लॉक तुटले नव्हते. ही बाब त्या व्यक्तीने पुंडलिकनगर पोलिसांना सांगितली. दरम्यान, गुन्हे शाखा पथकासह पुंडलिकनगर पोलिसही घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पाहणी केली असता, एटीएम गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास पिस्टलमधून गोळ्या घालून फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. परंतु एटीएम मशीन न फुटल्याने घटनास्थळावरून चोराने पलायन केल्याची बाबही स्पष्ट झाली. घटनेवेळी एटीएममध्ये सुमारे साडेतीन लाख रुपये होते. मशीन फोडण्यासाठी वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या घटनास्थळी दिसून आल्या. त्या पोलिसांनी जप्त केल्या. घटनास्थळी पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पाहणी केली.

गहाळ झालेल्या पिस्टलचा वापर? 
एटीएमवर गोळ्या घालण्यात आलेले पिस्टल सरकारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. सहा जानेवारीला मुख्यालयातील हवालदार अमित स्वामी यांचे पिस्टल गहाळ झाले होते, बहुधा तेच हे पिस्टल असावे तसेच काडतुसेही सारखीच असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

एटीएम केंद्र ‘रामभरोसे’
बऱ्याच दिवसांनंतर एटीम फोडण्याचा प्रकार घडला. विशेषत: शहरातील बहुतांश केंद्रात सीसीटीव्हीचा अभाव असून सुरक्षारक्षकही काही ठिकाणी नाही. त्यामुळे एटीएम केंद्र ‘रामभरोसे’ असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

संशयिताला पकडल्यानंतर त्याची चौकशी केल्यास गहाळ झालेल्या पिस्टलचा काही संबंध आहे का ते कळेल. पिस्टल आकाशवाणी परिसरात हरवले होते व घटनाही सेव्हनहिल परिसरात झाली. त्यामुळे संशय आहे. तरीही शस्त्रागारातील अधिकाऱ्यांकडून खात्री करून घेणार आहोत. 
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ दोन

Web Title: ATM loot Trying firing crime