जायकवाडीचे 9 वर्षानंतर उघडले 18 दरवाजे

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

  • गोदापात्रात झेपावले १० हजार क्युसेस पाणी
  • आवक वाढल्याने दुपारपर्यंत पुन्हा 10 हजार क्यूसेस पाणी सोडणार

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून  गुरुवारी (ता. 21) रात्री 12 वाजेच्या सुमारास तब्बल नऊ वर्षानंतर गोदापात्रात 10 हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 
दरम्यान, ४० हजार क्यूसेस आवक सुरू झाल्याने दुपारपर्यंत पुन्हा १० हजार क्यूसेस पाणी सोडणार असल्याचे सहायक अभियंता अशोक चव्हाण यांनी 'सकाळ'ला सांगितले.

आशिया खंडातील पहिले सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून जायकवाडीची ओळख आहे. या धरणावरच औरंगाबाद शहराची तहाण भागवली जाते. तसेच येथील पाण्यावरच अनेक उद्योगधंदे सुरु आहेत. या धरणातून 12 वर्षापूर्वी 27 जुलै 2005 रोजी 1 लाख 16 हजार क्‍यूसेक विसर्ग करण्यात आला होता. त्याचबरोबर 2 ऑगस्टपर्यंत चार वेळा दरवाजे उघडावे लागले.

नंतर पुन्हा वर्षभराने म्हणजे 3 ते 12 ऑगस्ट 2006 मध्ये 2 लाख 50 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यावेळी उर्ध्व भागातून तब्बल 2 लाख 80 हजार क्‍यूसेक पाण्याची आवक सुरु होती. त्यावेळी प्रशासनाची मोठी दमछाक झाली होती. त्यानंतर 12 व 13 सप्टेंबर 2008 रोजी 1 लाख 50 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या घटनेनंतर तब्बल 9 वर्षांनी गुरुवारी 10 हजार क्‍यूसेक पाण्याचा 18 दरवाजातून विसर्ग सुरु  आहे. जर १ लाख 16 हजार  क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला तर 17 गावे बाधीत होऊ शकतात. हे टाळण्यासाठी धरणावर खबरदारी घेतली जात आहे. येणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग केला जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोडे यांनी सांगितले.

बघ्यांची गर्दी 
जायकवाडी भरले, अशी माहिती मिळताच रात्री पासून धरणावर भघ्यांची गर्दी झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: aurangabad marathi news jaikwadi dam water