कायदा हातात घेतल्यास कारवाई - मिलिंद भारंबे

कायदा हातात घेतल्यास कारवाई - मिलिंद भारंबे

औरंगाबाद - भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद औरंगाबादेत उमटत आहेत. काही ठिकाणी हिंसक वळणही लागले, या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करीत आहोत, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाणार असल्याचा इशारा औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिला. मंगळवारी (ता. दोन) शहरात घडलेल्या हिंसक प्रकारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शहरात ठिकठिकाणी हिंसक प्रकार घडले आहेत. पोलिस आंदोलकांना समजावून सांगत आहे, काही ठिकाणी पूर्ण शांतता प्रस्तापित झाली आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शहरात अजूनही जमाव जमत आहेत, त्यांना पोलिस सामोरे जात आहेत. नेतेमंडळींबरोबर पोलिसांची बैठक झाली.

त्यांना पोलिसांनी समजावून सांगितले. या नेत्यांनी सामंजस्यांची भूमिका घेतली असून त्यांच्यासोबत पोलिस प्रत्येक तणावग्रस्त भागात जात आहेत.

आंदोलकांना समजावून सांगण्याचाच प्रयत्न केला गेला; परंतु काही ठिकाणी झालेल्या उद्रेकांमुळे जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.

कुठल्याही इतर पक्षांकडून व समाजाकडून घडणाऱ्या प्रकारांना समर्थन, प्रतिसाद मिळणार नाही, तसेच अशा कृतीला उत्तर, प्रतिक्रिया देणार नाही असे आश्‍वासन औरंगाबादच्या शांततेसाठी नेत्यांनी दिले आहे. काही तरुण वगळले तर सर्वांनाच औरंगाबादेत शांतता हवी आहे, असे श्री. भारंबे म्हणाले.  अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका, जुने व्हिडिओ इतर ठिकाणचे व्हिडिओ प्रसारित करून भावना भडकािवण्याचे काम करू शकतात. सोशल मीडियावर भावना भडकतील अशा पोस्ट टाकू नका. अशांवर गुन्हे नोंदविण्यात येतील, असे श्री. मिलिंद भारंबे म्हणाले.

महापालिका शाळांना आज सुटी
तणावपूर्ण वातावरण आणि देण्यात आलेली महाराष्ट्र बंदची हाक या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या शाळांना बुधवारी (ता. तीन) सुटी देण्यात आल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. महापालिकेच्या शहरात असलेल्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ७२ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्‍तांनी शिक्षण विभागाला यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

महापालिकेत शुकशुकाट
महापालिकेत मंगळवारी (ता. दोन) दिवसभर शुकशुकाट होता. सकाळी कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर घर गाठले. दुपारी बारा वाजता तरुणांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेतले. काही तुरळक अधिकारी वगळता सर्वच विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा होती. त्यामुळे महापौर, स्थायी समिती सभापती वगळता पदाधिकारीदेखील महापालिकेकडे फिरकले नाहीत.

शहरातील बहुतांश शाळा बंद
औरंगाबाद - भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरातील बहुतांश शाळा व खासगी क्‍लासेसला सुटी देण्यात आली होती.

सकाळपासूनच शहरात तणावाची परिस्थिती होती. या तणावामुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा काही तासानंतर सोडून देण्यात आल्या; तर काही शाळा चालकांनी पालकांना फोन करून शाळा बंद असल्याचे सांगितले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच पालकांनी मुलांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला, तर अचानक वातावरण चिघळल्यामुळे पहिल्या सत्रात पाठवलेल्या मुलांना काही तासांतच शाळेतून घरी आणण्यासाठी शाळेसमोर पालकांनी गर्दी केली होती.

या तणावामुळे अनेक शाळांसह खासगी क्‍लासेस व संस्थाना सुटी दिली होती. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांमध्ये शुकशुकाट होता. याशिवाय शाळेत घेऊन जाणाऱ्या बहुतांश रिक्षा, स्कूल बस मुलांना शाळेत आणण्यासाठी गेल्याच नाहीत. बुधवारी (ता. तीन) भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद पुकारल्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का नाही, याविषयी पालकांत संभ्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com