'टीसी'साठी लाच घेणाऱ्या मुख्यध्यापिकेस अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

औरंगाबाद - टीसी अर्थात शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या बदल्यात चक्क शाळेतील विद्यार्थ्यालाच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेला दोनशे रुपये घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. ही कारवाई रांजणगाव शेणपुंजी (ता. गंगापूर) येथील शाळेत शुक्रवारी दुपारी केली.

शमशाद मुनिरोद्दीन काझी (वय 52, रा. डिंबरगल्ली, बेगमपुरा) असे लाच प्रकरणात सापडलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. शाळेतील एक विद्यार्थी सहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणासाठी त्याला गावातीलच खासगी प्राथमिक शाळेत प्रवेश घ्यायचा असल्याने शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मिळण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाने अर्ज केला होता. सोबत सहावी उत्तीर्ण गुणपत्रकाची झेरॉक्‍स तसेच जिजामाता बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकाचे पत्र जोडले होते; परंतु त्याची अडवणूक करून मुख्याध्यापिका काझी यांनी शाळेचा दाखला देण्याच्या बदल्यात पाचशे रुपयांची लाच मागितली. याविरोधात विद्यार्थ्याच्या भावाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत विभागाने चौकशी केली असता, मुख्याध्यापिका काझी यांनी पाचशे रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा रचून विद्यार्थ्याच्या भावाकडून तडजोडीअंती दोनशे रुपयांची लाच घेताना काझी यांना पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.