अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला

औरंगाबाद - अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी बारापुल्ला गेट परिसरात अतिक्रमण हटविले. विरोध करणाऱ्या महिलांना पकडून नेताना पोलिस.
औरंगाबाद - अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी बारापुल्ला गेट परिसरात अतिक्रमण हटविले. विरोध करणाऱ्या महिलांना पकडून नेताना पोलिस.

औरंगाबाद - अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १५) बारापुल्ला गेट परिसरात घडला. या दगडफेक, चाकूहल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, महापालिकेचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोतवालपुरा वॉर्डाच्या नगरसेविका नसरीन बेगम समद यारखान यांनी बारापुल्ला गेटलगत नाल्यांमध्ये असलेल्या अतिक्रमणांविषयी तक्रार केली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही त्यांनी वारंवार हा विषय उपस्थित करून कारवाईची मागणी केली. त्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पथक कारवाई करण्यासाठी या ठिकाणी पोचले. पथक कारवाई करणार असल्याची कुणकुण येथील महिलांना लागली होती. विरोध करण्यासाठी महिला तयारीतच बसल्या होत्या. मात्र, महिला असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजविण्याची भूमिका घेतली. मात्र, त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.

विरोध झुगारत पथकाने कारवाई सुरू केली, तोच महिलांनी पथकावर दगडफेक सुरू केली. दगडांचा मारा जोरात असल्याने कर्मचारी व पोलिस सैरभैर झाले. काही काळ तणाव निर्माण झाला. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे अधिकारी सी. एम. अभंग यांनी कारवाई थांबवून महिला पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागवून घेतला. काही वेळातच दहा ते बारा महिला पोलिसांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही महिलांचा विरोध कायम होता, काहींनी चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर काहींना पथकातील कर्मचाऱ्यांच्या व स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले; मात्र त्यांना विरोध डावलून ताब्यात घेण्यात आले.

महापालिकेची पोलिसांत तक्रार
अतिक्रमण हटविण्यास विरोध करीत महिलांनी गोंधळ घालत महापालिकेच्या पथकावर हल्ला केल्याने खळबळ उडाली. एक पोलिस तोंडाला दगड लागल्याने जखमी झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी रात्री छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com