काळ्या मांजरीने केली पोलिसांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

र्औरंगाबाद - होनाजीनगर (जटवाडा रोड) परिसरातील शेतात एका खड्ड्यात काळी मांजर पुरून ठेवल्याचा प्रकार उघड झाला; मात्र भलताच संशय व्यक्त करून नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिस यंत्रणा कामाला लागली, बॉम्ब स्कॉडही शोध मोहिमेवर निघाले. खोदकाम केल्यावर काळ्या मांजरीचे पिलू कपड्यात गुंडाळून पुरल्याचे समोर आले. आता हा काय प्रकार आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मंगळवारी (ता. वीस) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

काळी मांजर पुरल्याने भलतीच काहीतरी घटना असल्याचा संशय व्यक्त करून नागरिकांनी बेगमपुरा पोलिसांना माहिती दिली.

सुरवातीला हर्सूल पोलिस ठाण्याचे चार्ली पथक घटनास्थळी दाखल झाले; मात्र घटनास्थळ बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने नंतर बेगमपुरा ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा नुकताच खोदलेला आणि नंतर बुजवलेला खड्डा दिसून आला. पुरलेल्या ठिकाणी मोठा दगड ठेवलेला होता; मात्र खड्डा खोदण्यापूर्वी खबरदारी म्हणून पोलिसांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकाला बोलावून घेतले. बॉम्ब शोधक पथकाच्या खात्रीनंतर खड्डा खोदण्यात आला. दरम्यानच्या काळात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. खड्डा खोदल्यानंतर त्या ठिकाणी एका नव्या शालीमध्ये गुंडाळलेले काळ्या मांजरीचे छोटे पिलू आढळून आले. हा अंधश्रद्धेचा भाग आहे किंवा ती पाळीव मांजर आहे, याबाबत पोलिस शोध घेत आहेत. या वेळी पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे, सहायक उपनिरीक्षक जी. एस. सोनावणे, बॉम्ब शोधक पथकाचे राजू बिघाटे, अनिल वानखेडे, गिरिजानंद भगत, प्रसाद लोखंडे, चार्लीचे श्रीकांत सपकाळ, कुंदन आवारे, अमोल राठोड, श्रीराम गुसिंगे, केशव पवार यांची उपस्थिती होती.