घाटीने दिले बारा वर्षांच्या मुलाला जीवदान

औरंगाबाद - घाटीच्या मेडिसीन विभागात उपचार घेत असलेल्या ऋषिकेश सुसरसोबत केके ग्रुपचे सदस्य.
औरंगाबाद - घाटीच्या मेडिसीन विभागात उपचार घेत असलेल्या ऋषिकेश सुसरसोबत केके ग्रुपचे सदस्य.

औरंगाबाद - घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. अशातच एकुलता एक मुलगा खेळता-खेळता अचानक चक्कर येऊन पडला. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला श्‍वास, हात आणि पायाचा पक्षाघात (जीबी सिंड्रोमचा) झाल्याचे निदान झाले. त्याच्या आईने त्याला घेऊन सरळ घाटी गाठली. घाटीचे डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांनी तत्पर सेवा देत ७० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्या मुलाचे प्राण वाचविले.  

ऋषिकेश सुसर (१२, रा. आसई) हा खेळताना चक्कर येऊन खाली पडला. त्याच्या हात-पायांनी काम करणे बंद केले. त्याची आई मुक्ताबाई यांनी त्याला भोकरदनला खासगी डॉक्‍टरांना दाखवले. त्यांनी औरंगाबादला एका खासगी रुग्णालयात संदर्भित केले. या रुग्णालयात उपचाराचा खर्च पेलवणार नसल्याने तेथील डॉक्‍टरांनी घाटीत जाण्याचे सांगितले. घाटीत पथक तीनचे प्रमुख डॉ. प्रभाकर जिरवणकर यांच्याकडे मुक्ताबाई मुलाला घेऊन आल्या. त्यांनी त्याला तत्काळ एमआयसीयूत दाखल करून घेतले. 

श्‍वास घेता येत नसल्याने त्याला व्हेंटिलेटर लावले. आणायला उशीर झाल्याने जीबी सिंड्रोमचा प्रभाव खूप जास्त झाला होता. त्यामुळे त्याच्या श्‍वासनलिकेचे स्नायू पातळ झाले, तर हात-पायांचे स्नायू काम करीत नव्हते; पण योग्य उपचारांनी आता तो स्वतःचा श्‍वास घेत आहे. त्याची आई आणि मामा त्याची काळजी घेत आहेत. ऋषिकेशच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनात पथक तीनचे प्रमुख डॉ. जिरवनकर, डॉ. कैलास चितळे, डॉ. प्रणय जांभुळकर, डॉ. शेषाद्री, डॉ. स्नेहा यांच्यासह आणि एमआयसीयूतील डॉक्‍टर, परिचारिकांनी परिश्रम घेतले.

केके ग्रुपची मदत 
मुक्ता सुसर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने केके ग्रुपचे अकिल अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, जमीर पटेल, महंमद आसेफ यांनी ऋषिकेशच्या उपचारासाठी औषधी देऊन मदतीचा हात दिला. शिवाय रोजच्या जेवणाची व्यवस्थाही त्यांनी करून दिल्याचे मुक्ताबाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com