आधी स्वच्छता, मग शहर बस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाअंतर्गत महापालिकेने दोन महिन्यांत शहर बस सेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली असताना त्याला स्मार्ट सिटी प्रकल्प ‘एसपीव्ही’चे प्रमुख मार्गदर्शक व राज्य शासनाच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी ब्रेक लावला आहे. शहर बस पूर्वी स्वच्छता, हरित औरंगाबादला प्राधान्य द्या, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. 

केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात औरंगाबाद शहराची निवड झाल्यानंतर निधी येऊन वर्षभराचा काळ उलटला आहे; मात्र प्रकल्प अहवाल तयार करण्यापलीकडे महापालिकेची तयारी झालेली नाही. यापूर्वी शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्प एसपीव्हीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपूर्व चंद्रा यांची नियुक्ती केली होती; मात्र ते स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी येऊ शकले नाहीत. दरम्यान, त्यांच्या जागेवर राज्य शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी श्री. पोरवाल यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर हे दोन दिवस बैठकीच्या निमित्ताने मुंबईला होते. बैठका आटोपल्यानंतर त्यांनी श्री. पोरवाल यांची भेट घेतली. या संदर्भात माहिती देताना श्री. मुगळीकर म्हणाले, की शहर बसचा विषय त्यांच्या कानावर टाकला. त्यांनी शहर बस ठीक आहे; पण त्यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, हरित औरंगाबाद याला प्राधान्य द्या, असे सांगितले. शहर बसबद्दल नेमकी काय भूमिका आहे, ते स्पष्टपणे मांडा. शहर बस कोण घेणार, घेतलेल्या बस कोण चालविणार? याची सविस्तर सादर करा, तसेच स्वच्छ आणि हरित शहराचा कृती आराखडा तयार करा, अशी सूचनाही त्यांनी केली.

स्मार्ट सिटीसाठी महिनाअखेरीस बैठक
आयुक्त श्री. मुगळीकर म्हणाले की, एसपीव्हीच्या (स्पेशल पर्पज व्हेकल) माध्यमातून सोलार प्रकल्प आणि स्मार्ट लायटिंगच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीच्या बैठकीसाठी पोरवाल २९ नोव्हेंबरला औरंगाबादेत येणार आहेत. तयार असलेले सर्व प्रकल्प अहवाल या बैठकीत ठेवू, एसपीव्हीची मान्यता मिळाल्यावर कामांना प्रत्यक्ष सुरवात होईल.