आयुक्तांची भाजपशी ‘खास’ जवळीक - शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - सत्तेत सहभागी असताना विश्‍वासात न घेता भाजपच्या एका ‘खास’ पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून महापालिकेत निर्णय घेण्यात येत असल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन शनिवारी (ता. १६) आगपाखड केली. आम्हाला विचारल्याशिवाय यापुढे एकही एकतर्फी निर्णय झाला तर वेगळा विचार करू, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असली तरी राज्याप्रमाणेच प्रत्येक निर्णयानंतर दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाची ठिणगी पडत आहे.

युतीच्या करारानुसार सध्या एका वर्षासाठी महापौरपद भाजपकडे आहे. मात्र, महापौर भगवान घडामोडे विश्‍वासात घेत नसल्याची तक्रार वारंवार शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येते. दोन पक्षांतर्गत वाढलेली धुसफूस शनिवारी आयुक्तांच्या दालनापर्यंत गेली. आयुक्तांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयावर उपमहापौर स्मिता घोगरे व सभागृहनेते गजानन मनगटे यांनी जाब विचारला. सातारा-देवळाई नगर परिषदेच्या महापालिकेत वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव आहे.

मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. त्यांची शैक्षणिक अर्हता तपासण्यात आली नाही. आरक्षणाचा विचार झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा व जाहिरात देऊन नव्याने भरती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापौरांनी सेवाभरती नियमामध्ये बेकायदा बदल केले आहेत. त्यावरदेखील आक्षेप घेण्यात आला. भूमिगत गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६४ कोटींचा करण्यात आलेला ठरावही रद्द करण्यात यावा, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. यापुढे कोणताही निर्णय होण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळालीच पाहिजे. यातील अनेक निर्णय भाजपच्या एका ‘खास’ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून घेण्यात येत असल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. हा प्रकार थांबला नाही तर वेगळा विचार करू, असा इशारा आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ऐनवेळचे विषय बंद 
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणारे सर्वच विषय वादग्रस्त ठरत आहेत. शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांचा ठरावसुद्धा विश्‍वासात न घेता ऐनवेळी घेण्यात आला. त्यामुळे यापुढे एकही ऐनवेळचा विषय घेण्यात येऊ नये, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी नगर सचिवांना बोलावून ऐनवेळचे विषय घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना केल्या.