‘घाटी’चे शवविच्छेदनगृह होणार अत्याधुनिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

शासनाकडे पाच कोटींची मागणी, शीतगृहाची क्षमताही वाढणार 

औरंगाबाद - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) रोज आठ ते दहा शवविच्छेदन होतात; मात्र शवविच्छेदनगृहाची इमारत पन्नास वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे ती जीर्ण झाली असून, या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या इमारतीच्या अत्याधुनिकीकरणासाठी घाटी प्रशासनाने पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

‘घाटी’च्या शवविच्छेदनगृहात पावसाळ्यात भिंती ओलावा धरत आहेत. परिणामी, इमारत कायम ओलसर राहते. जीर्ण झालेल्या या इमारतीत काम करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या येथील शीतगृहामध्ये वीस मृतदेह क्षमता आहे. अत्याधुनिकीकरण केल्यास ती पंचवीसवर जाईल. ‘सहयोग ट्रस्ट’ने वर्ष २०११ मध्ये उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील शवविच्छेदनगृहांच्या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायवैद्यक व विष शास्त्र विभागाच्या (एफएमटी) अंतर्गत येणाऱ्या ‘घाटी’तील शवविच्छेदनगृहाच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात गोवा राज्याच्या धर्तीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ कोटी ९९ लाख ७८ हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. २६) ‘घाटी’त पार पडलेल्या बैठकीतही या प्रस्तावावर चर्चा झाली. वित्त विभागाशी यासंबंधी चर्चा करू, अशी माहिती शिनगारे यांनी दिली. या प्रस्तावात भविष्यातील गरज ओळखून इमारतीचे बांधकाम, अत्याधुनिक शीतगृह, यंत्रसामग्री, प्रात्यक्षिक सादरीकरण सभागृह प्रस्तावित आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्वच शवविच्छेदनगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव लवकर मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न केले जातील. 
- डॉ. के. यू. झिने, विभागप्रमुख, एफएमटी