वीस लाखांसाठी गमाविले सात लाख!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - सुखाची अर्धी भाकरी बरी, अशी म्हण सर्वश्रुत आहेच; परंतु ही बाब लक्षात न घेता एका व्यापाऱ्याने वीस लाखांच्या कर्जमोहात पडून पदरचे सात लाख सोळा हजार रुपये गमाविले. भामट्याने कर्जाच्या नावाखाली व्यापाऱ्याची फसवणूक केली. ही घटना वीस सप्टेंबर ते सोळा ऑक्‍टोबरदरम्यान घडली.

दलपतभाई दामजीभाई पटेल (रा. सिडको, एन- आठ) हे व्यापारी असून, त्यांना वीस सप्टेंबरला मोबाइलवर एका महिलेचा कॉल आला. ‘‘आपण बजाज फायनान्स, पुणे येथून बोलत आहोत. कर्ज हवे असल्यास बजाज फायनान्सच्या ई-मेल आयडीवर केवायसीसंबंधित कागदपत्रे पाठवा,’’ अशी तिने पटेल यांना थाप मारली. कर्ज मिळेल या आशेने पटेल यांनी कागदपत्रे ई-मेलवरून पाठविली. त्यानंतर महिलेने परत फोन करून वीस लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे पटेल यांना सांगत रक्कम मिळण्यापूर्वी दहा टक्के रक्कम म्युच्युअल फंडासाठी भरावी लागेल, असे सांगितले. यावर विश्‍वास ठेवून पटेल यांनी कर्जाच्या दहा टक्के रक्कम भरणा केली. त्यानंतर पुन्हा महिलेने फोन करून पटेल यांना ना-हरकत प्रमाणपत्र शुल्क व कर्ज रक्कम कार्ड शुल्क भरावे लागेल, असे सांगितले.

त्यानुसार डेग्राशी सोल्युशन, यश बॅंक शाखा कापासेरा, दिल्ली येथील खात्यावर एकूण सात लाख सोळा हजार दोनशे रुपये भरणा केले. यानंतर मात्र, ना कर्ज मिळाले, ना त्यांची रक्कम. संबंधित संपर्क क्रमांकावर कॉल केल्यानंतरही प्रतिसाद आला नाही. फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच पटेल यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, भामट्यांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. तपास पोलिस निरीक्षक श्री. बारगळ करीत आहेत.