कर्जमाफीची सवय पडायला नको - खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

औरंगाबाद - कर्जमाफीने सगळ्याच गोष्टी साध्य होतील, असे नाही. यापुढेही पीक कमी येईल, दुष्काळ पडेल, या बाबी घडतच राहतील. मात्र, कर्जमाफीची सवय पडायला नको. दरवेळेस कर्जमाफी शक्‍य नाही. कुठेतरी ‘लाइन ड्रॉप’ करावी लागेल, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्‍त केले. यावेळची कर्जमाफी ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद - कर्जमाफीने सगळ्याच गोष्टी साध्य होतील, असे नाही. यापुढेही पीक कमी येईल, दुष्काळ पडेल, या बाबी घडतच राहतील. मात्र, कर्जमाफीची सवय पडायला नको. दरवेळेस कर्जमाफी शक्‍य नाही. कुठेतरी ‘लाइन ड्रॉप’ करावी लागेल, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्‍त केले. यावेळची कर्जमाफी ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (ता. २७) शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘कर्जमाफीसंदर्भात माझी भूमिका ही वेळ पडली तर कर्ज घ्या; पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशीच होती. गरज नसलेल्यांना ती देऊ नका. अल्पभूधारकांना लाभ व्हावा. मागच्या चुका आता नको. या बाबींची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कर्जमाफीत आहे. कर्जमाफीसोबत आता हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे आहेत. यासाठी संघटनांनी प्रबोधन केले पाहिजे. शेतकऱ्यांकडे कार्यकर्ता नव्हे, तर शेतकरी म्हणून पाहिले पाहिजे. विरोधी पक्ष, संघटनांना घेऊन सत्ताधाऱ्यांनी समिती नेमून यावर कायमस्वरूपी उपाय काढले पाहिजेत. स्वामिनाथन, कृषिमूल्य आयोगावर समितीच निर्णय घेईल.

‘आरक्षणासाठी दूत होईन’
सरकारशी किती दिवस संघर्ष करायचा. कुठे तरी डेडलाइन ठरवायला हवी. मी नेतृत्व नाही, तर मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करायला तयार आहे. चर्चा तुम्हीच करा. मुख्यमंत्र्यांकडे सन्मानाने घेऊन जाण्याची जबाबदारी मी पार पाडू शकतो.

गड-किल्ल्यांसाठी महामंडळ
राज्यातील गड-किल्ल्यांचा ‘बॅंड ॲम्बेसिडर’ हे शोभेचे पद आहे. याची जाणीव आहे. मात्र, गड-किल्ले संवर्धनासाठी महामंडळ स्थापन व्हावे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या माध्यमातून दरवर्षी ४०० ते ५०० कोटींची तरतूद करून घेता येईल. हाच पुढचा टप्पा असेल.

मुश्रिफांसाठी दुय्यमच होतो
मी पूर्वी ‘राष्ट्रवादी’त होतो. तिथे हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे नेते समजायचे. इतर सगळ्यांनाच दुसऱ्या फळीतील समजायचे. त्या तुलनेत आता छत्रपतींच्या घराण्याला सन्मानच मिळतोय. असे सांगताना संभाजीराजे छत्रपतींनी सन्मानाची अनेक उदाहरणेच सांगितली.

पुजाऱ्यांचीच चुकी होती
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला घागरा-चोळी घातल्याने वातावरण चिघळले आहे; मात्र यात पुजाऱ्यांचीच चुकी आहे. त्यांनी तसे करायला नको होते. तरीही या वादात मला पडायचे नाही. असे म्हणत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
 

शरद पवारांचे मत बरोबरच
शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच. शरद पवार चुकीचे काय बोलले. ते बरोबरच आहेत. शिवाजी महाराज कुळवाडीभूषणच आहेत अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे. भाजपलाही मी आहे तसाच हवा आहे. त्यांचा काहीच आक्षेप नसेल, असे विधान संभाजीराजे छपतींनी शरद पवारांच्या विधानावर केले.