महानिर्मिती कंपनीकडे कोळसा चारच दिवसांचा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - राज्यात वीजटंचाईने भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महानिर्मिती कंपनीकडे केवळ चार दिवसांचा कोळसा असून, अजून कोळसा उपलब्ध झाला नाही, तर भारनियमनाचे चटके अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद शहरात चौथ्या दिवशी कमी गळती असलेल्या सी वर्गाच्या फिडरवरही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. 

औरंगाबाद - राज्यात वीजटंचाईने भारनियमनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महानिर्मिती कंपनीकडे केवळ चार दिवसांचा कोळसा असून, अजून कोळसा उपलब्ध झाला नाही, तर भारनियमनाचे चटके अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद शहरात चौथ्या दिवशी कमी गळती असलेल्या सी वर्गाच्या फिडरवरही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे. 

राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने वीजटंचाईचे संकट कोसळले आहे. राज्यभर भारनियमन करून विजेची तूट भरून काढावी लागत आहे. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीने जनसामान्य नागरिक त्रस्त झालेत. रविवारपासून (ता. दहा) लोडशेडिंग सुरू करण्यात आलेले असून, तीन-चार दिवस हीच परिस्थिती राहील अशी अपेक्षा होती; मात्र चौथ्या दिवशीपर्यंत कोळशाची पुरेशी उपलब्धता झाली नाही. सध्या येत्या चार दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. या काळात पुरेसा कोळसा उपलब्ध झाला नाही, तर वीजटंचाईने संपूर्ण राज्य काळोखात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहेत. 

वीजगळती भयंकर 
महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद व जालना या दोन्ही शहरात वीज गळतीचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के आहे. या भागात आकडे टाकून विजेचा वापर करणे, मीटरमध्ये फेरफार करणे, रिमोट कंट्रोलचा वापर करणे अशा विविध प्रकारांनी वीज चोरी होत आहे. या वीज चोरीने दोन्ही जिल्ह्यात ५० कोटींपेक्षा अधिक तोटा होत आहे. औरंगाबाद शहरात हा तोटा चाळीस कोटींच्या घरात आहे. महावितरणचा मराठवाड्याचा संचित तोटा तीन हजार कोटींच्या जवळपास आहे. हा तोटा असतानाच कोळशाच्या तुटवड्याने वीजटंचाई निर्माण झाल्याने वीज गळतीच्या फिडरवर लोडशेडिंग करण्यात येत आहे. 

पाण्याच्या वेळा बदला
अचानक सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे शहरात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोडशेडिंगच्या वेळा असल्याने या काळात पाणी येणाऱ्या नागरिकांना मोटारीअभावी पाणी भरता येत नाही. त्यामुळे लोडशेडिंगच्या वेळा बदलण्याची मागणी महापालिकेने केली होती; मात्र विजेच्या मागणी असलेल्या काळातच लोडशेडिंग करावे लागते. त्यामुळे महापालिकेने लोडशेडिंगच्या वेळा वगळून अन्य वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असे पत्र महापालिकेला दिल्याचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.

शहरात लोडशेडिंग वाढले 
महावितरणने शहरात वीजगळतीनुसार फिडरची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार वर्ग ए - ० ते १८ टक्के वीजगळती (लोडशेडिंग सव्वातीन तास), वर्ग- ब- १८ ते २८ टक्के गळती (लोडशेडिंग चार तास), वर्ग - सी- २० ते ३५ टक्‍के गळती (लोडशेडिंग पावणेपाच तास), वर्ग ड- ३४ ते ४२ टक्के गळती (लोडशेडिंग साडेपाच तास), वर्ग ई- ४२ ते ५०) टक्के गळती (लोडशेडिंग सव्वासहा तास), वर्ग एफ- ५० ते ५८ टक्के गळती (लोडशेडिंग सात तास), वर्ग जी-१- ५८ ते ६६ टक्के (लोडशेडिंग पावणेआठ तास), वर्ग जी-२- ६६ ते ७४ टक्के (लोडशेडिंग साडेआठ तास), वर्ग जी-३- ७४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक (लोडशेडिंग साडेआठ तासापेक्षा अधिक) गेल्या चार दिवसांपासून, एबीसी या तीन वर्गात लोडशेडिंग नव्हते. मात्र, गुरुवारपासून (ता. १४) सी वर्गातही लोडशेडिंग सुरू करण्यात आले आहे.