अकरावी प्रवेशाचे तब्बल तीन महिने भिजत घोंगडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महापालिका हद्दीतील महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा प्रयोग यंदा प्रथमच ऑनलाइन राबविण्यात आला. प्रवेशप्रक्रियेची अंतिम फेरी ता. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान घेण्यात येत असून तब्बल दोन ते अडीच महिने राबविण्यात आलेला हा प्रयोग अजून पंधरा दिवस तरी असाच सुरू राहणार आहे. 

औरंगाबाद - महापालिका हद्दीतील महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेचा प्रयोग यंदा प्रथमच ऑनलाइन राबविण्यात आला. प्रवेशप्रक्रियेची अंतिम फेरी ता. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान घेण्यात येत असून तब्बल दोन ते अडीच महिने राबविण्यात आलेला हा प्रयोग अजून पंधरा दिवस तरी असाच सुरू राहणार आहे. 

चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ही फेरी म्हणजे अंतिम संधी असणार आहे. शासन निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) या तत्वानुसार प्रवेश पूर्ण करण्यात येणार आहेत. यानंतर कोणत्याही प्रकारची प्रवेश फेरी होणार नसून, रिक्त जागांवर ऑफलाइन पद्धतीने निवड करता येणार नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कळविले आहे.

महापालिका हद्दीतील १२६ महाविद्यालयांत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेच्या एकूण चार गुणवत्ता याद्या, दोन विशेष फेऱ्या, स्पॉट ॲडमिशनची एक विशेष फेरी अशा सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये २६ हजार ४२५ पैकी १६ हजार ४०९ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. दहा हजार १६ जागा अजूनही रिक्त आहेत. दुसरी विशेष फेरी ८ सप्टेंबरपासून घेण्यात आली. या फेरीत सोमवारपर्यंत (ता. ११) एकूण ५९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

असे असेल वेळापत्रक
ता. १६ सप्टेंबर - सकाळी दहा ते चारपर्यंत विद्यार्थ्यांना यापूर्वीचा मिळालेला प्रवेश रद्द करण्याची संधी. तसेच नवीन अर्ज करणे, अपूर्ण अर्ज ॲप्रूव्ह करणे, महाविद्यालयांनी कोट्याच्या जागा प्रत्यार्पित करणे.

ता. १८ सप्टेंबर - सकाळी नऊ वाजता रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

ता. १९ ते २५ सप्टेंबर - दहावी उत्तीर्ण किंवा एटीकेटीप्राप्त परंतु कोणत्याही ठिकाणी प्रवेश न घेतलेले विद्यार्थी ऑनलाइन क्‍लिक करुन अलोकेशन मिळवतील.

ता. १९ ते २५ सप्टेंबर - सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार. 

ता. २५ सप्टेंबर - सायंकाळी पाच वाजता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण.

अकरावी प्रवेशासंदर्भात आज बैठक
औरंगाबाद - तब्बल अडीच ते तीन महिने सुरू राहणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दिवसेंदिवस गुंतागुंतीची ठरत चालली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका हद्दीतील महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशाचा ऑनलाइन प्रयोग करण्यात आला; परंतु यात प्रत्येक प्रवेश फेरी, अलॉटमेंट यात गोंधळ उडाला आहे. परिणामी महाविद्यालये, विद्यार्थी पालकांत संभ्रम कायम आहेत. 

लवकरच या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी होणार असून त्या संदर्भातील आढावा बैठक ही शुक्रवारी (ता. १५) सकाळी १० वाजता सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे. या बैठकीस औरंगाबाद मनपा क्षेत्रातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित संस्थेचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कळविले आहे.