हजारो अतिक्रमणांनी अडविले नाल्यांचे मार्ग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरातील नाले गिळंकृत करण्याचा भूखंड माफियांनी गेल्या काही वर्षांत सपाटा लावला असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाल्यांवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा कागदावरच राहते. त्यात एखादा मोठा पाऊस झाला, की पुन्हा घोषणेची आठवण येते. वर्षानुवर्षे हा धुळफेकीचा प्रकार सुरूच असल्याने शहरातील १४ लाख नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

औरंगाबाद - शहरातील नाले गिळंकृत करण्याचा भूखंड माफियांनी गेल्या काही वर्षांत सपाटा लावला असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाल्यांवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा कागदावरच राहते. त्यात एखादा मोठा पाऊस झाला, की पुन्हा घोषणेची आठवण येते. वर्षानुवर्षे हा धुळफेकीचा प्रकार सुरूच असल्याने शहरातील १४ लाख नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

दरवर्षी पावसाळ्याला प्रारंभ होताच नाल्यांवरच्या अतिक्रमणांचा विषय ऐरणीवर येतो. मोठा पाऊस होताच नाल्याकाठच्या घरांमध्ये हाहाकार उडतो. अनेकांचे संसार उघड्यावर येतात. त्यानंतर नगरसेवक आक्रमक होतात, प्रशासन नगरसेवकांचे समाधान करण्यासाठी थातूरमातूर कारवाया करून मोकळे होते. हेच चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे.

बुधवारी झालेल्या पावसाने नाल्यांवरील अतिक्रमणांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. गेल्या काही वर्षात भूखंडमाफियांनी नकाशावरील नाले गायब करून त्यावर सर्रासपणे प्लॉटिंग करून जागा विक्री केल्या आहेत.

जयभवानीनगर, गारखेडा परिसर, भवानीनगर, जुन्या शहरातील अनेक भागांत हा प्रकार सुरू आहे. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी आता तीन-चारमजली टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. 

काही ठिकाणी नाल्यात कॉलम घेऊन तर काही ठिकाणी चक्क नाल्यावरच इमारती बांधून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आला आहे. त्यामुळे मोठे पाऊस होताच शहरात हाहाकार उडत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर येणाऱ्या काळात शहराचीदेखील मुंबई होण्यासाठी वेळ लागणार नाही. बुधवारी झालेला पाऊस हा शहरासाठी धोक्‍याची सूचना असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. 

वीस लाखांचे सर्वेक्षण फाईलबंद   
नाल्यांवरच्या अतिक्रमणांवर हातोडा मारण्यासाठी तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी नगरभूमापनमार्फत नाल्यांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी तिरुपती विहार ते चाणक्‍यपुरी, बन्सीलालनगर-राजनगर ते जहाँगीर कॉलनी, गादिया विहार ते शहानूरमियाँ दर्गा, किराडपुरा इलियास मशीद ते कटकटगेट, भानुदासनगर महादेव मंदिर ते झांबड इस्टेट या सहा नाल्यांचे नकाशे तयार करण्यासाठी तत्काळ २० लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानुसार वर्षभरात टोटल स्टेशन या अत्याधुनिक मशिनने नाल्यांची मोजणी केली व नकाशे महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आले. या नकाशानुसार किमान नऊ हजार अतिक्रमणे नाल्यांमध्ये असू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र गेल्या सात वर्षांपासून हे सर्वेक्षण महापालिकेच्या नेहमीच्या कारभारानुसार फाईलबंद आहे.

जयभवानीनगरात १३० अतिक्रमणे 
जयभवानीनगरातील नाल्यांच्या अतिक्रमणांवर तीन वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. या नाल्यातून भूमिगत गटार योजनेअंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वेक्षण केले. त्यानुसार अतिक्रमणे काढण्यासाठी १३० जणांना नोटिसा देण्यात आल्या. प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीत वॉर्डाच्या नगरसेविका मुंडे हा विषय मांडतात. मात्र, अद्याप अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आलेली नाही. जुन्या नकाशांमध्ये हा नाला ३० फुटांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र तीन फुटांचा नालादेखील सध्या अस्तित्वात नाही. मोठा पाऊस होताच जयभवानी चौकासह घरा-घरांत पाणी घुसते. 

उच्चभ्रू वसाहतीतील नाले दाबले 
कॅनॉट प्लेस भागातून निघणारा हा नाला सिडको एन-३, एन-४ मधून निघून जयभवानीनगरमार्गे विमानतळाच्या संरक्षण भिंतीकडे जातो. गुंठेवारी भाग असलेल्या जयभवानीनगरात या नाल्यावर प्लॉटिंग टाकून चार-चारमजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. उच्चभ्रू वसाहत असलेल्या सिडको भागातही जागोजागी नाल्यावर स्लॅब टाकून या जागा पार्किंगसाठी वापरण्यात येत आहेत.

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागा गिळंकृत
जागोजागी बांधल्या टोलेजंग इमारती
सर्वेक्षण करून, नोटिसा बजावूनही कारवाई होईना
नकाशांवरून गायब केले अनेक नाले