पाण्यात वाहून गेल्यानंतरही ‘ती’ बालंबाल बचावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ ही म्हण सर्वांनाच परिचित. याचाच प्रत्यय बुधवारी (ता. २०) आला. धो-धो बरसणाऱ्या पावसाने आठवर्षीय मुलगी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पण तासाभरातच पोलिस-अग्निशामक दलाने तिला सुखरूपपणे शोधून काढले. ही घटना संतोषीमातानगर, मुकुंदवाडी भागात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

औरंगाबाद - ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ ही म्हण सर्वांनाच परिचित. याचाच प्रत्यय बुधवारी (ता. २०) आला. धो-धो बरसणाऱ्या पावसाने आठवर्षीय मुलगी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. पण तासाभरातच पोलिस-अग्निशामक दलाने तिला सुखरूपपणे शोधून काढले. ही घटना संतोषीमातानगर, मुकुंदवाडी भागात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

राणी सुरेश दाभाडे (वय आठ, रा. अंबिकानगर) असे मुलीचे नाव असून ती नालंदा शाळेत शिक्षण घेते. शाळा सुटल्यानंतर ती घरी येत होती. त्यावेळी जोरदार पाऊस कोसळत होता. राजीव गांधीनगर व अंबिकानगरला जोडणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत होते. पण तिला पाण्याचा अंदाज आला नाही. ती पुलावरुन जाताना पावसाच्या पाण्याने तिला वेढून घेतले. यानंतर तोल जाऊन ती प्रवाहासोबत वाहून गेली. क्षणात मुलगी गायब झाल्याची बाब समजल्यानंतर कुटुंबीय व स्थानिक हादरले. मुलगी वाहून गेल्याची बाब परिसरात पसरली. यानंतर स्थानिक पोलिसांनी तसेच वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे अंमलदार संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला. 

मुलगी पुरात वाहून गेल्याची बाब समजताच त्यांनी गस्तीवरील चार्ली पोलिस कर्मचारी शिंदे, डोळस, गंडे व नानेकर यांना पाचारण केले. घटनास्थळी चौघांचे पथक पोचले. पाठोपाठ अग्निशामक दलाचे जवान वाहनासह दाखल झाले. सर्वांनी मुलीचा शोध घेतला व पुलापासून पाचशे फूट अंतरावर ती होती. तासाभरात मुलीला शोधून काढण्यात पोलिस व अग्निशामक दलाला यश आले. नगरसेवक भाऊसाहेब जगताप, ज्ञानेश्‍वर डांगे, मोहन साळवे यांच्यासह नागरिकांचीही पोलिसांना मोठी मदत झाली. दरम्यान, मुलीला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सर्वांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास
काही दिवसांपूर्वी पावसादरम्यान आलेल्या पुरामुळे चिकलठाणा व एमआयटी महाविद्यालयासमोरील नाल्यात पडून दोनजण वाहून गेले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. परंतु आठवर्षीय मुलगी पुरात वाहून गेल्यानंतर ती बालंबाल बचावली. ती सुखरूप असल्याचे पाहून सर्वांना हायसे वाटले.