कर्जमाफीचे श्रेय शेतकरी आंदोलनालाच - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

औरंगाबाद - ‘‘शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, अशी मागणी सर्वच पक्षांनी केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी संपही केला. त्या आधारे राज्य सरकारने शेतकऱ्यांना ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी दिली. याचे श्रेय केवळ शेतकरी आंदोलनालाच जाते असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले. याबरोबरच दीड लाखाच्यावरची थकबाकी शेतकऱ्यांनी कुठून भरावी असे विचारल्यानंतर त्यांनी तो त्यांचा प्रश्‍न असल्याचे सांगुन कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दीड लाखाचीच कर्जमाफी मिळेल असे स्पष्ट केले. 

श्री. दानवे हे बुधवारी (ता.२८) महापौरांच्या निवासस्थानी आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीने सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडल्याचे सांगितले होते. या संदर्भात श्री. दानवे यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी या प्रश्‍नाला थेट उत्तर न देता ते म्हणाले, ‘‘सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी केली होती; परंतु कर्जमाफीचे यश हे शेतकऱ्यांच्या संपाचे आहे. शेतकऱ्यांनी संप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावनांची दखल घेत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे’’, असे सांगत त्यांनी शिवसेनेचा दावा फारसा मनावर घेत नसल्याचे संकेत दिले.

‘‘यापूर्वीच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती; मात्र त्या वेळी महाराष्ट्राच्या वाट्याला फक्‍त सात हजार कोटी आले होते. त्या तुलनेत फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी ही कितीतरी पटीने अधिक आहे. याचा ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदारांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. याशिवाय पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांनाही या कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्यांनाही २५ टक्‍के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे,’’ अशी माहितीही त्यांनी दिली.

दीड लाखासाठी भरावी लागणारी रक्‍कम 
दीड लाखापर्यंत कर्जमाफी सरकारने दिली आहे हे सांगताना खासदार श्री. दानवे म्हणाले, ‘‘एखाद्या शेतकऱ्याकडे चार लाख थकबाकी असेल; तर त्या थकबाकीदार शेतकऱ्याला दीड लाख कर्जमाफी दिली जाईल. उर्वरित अडीच लाख रुपये त्याला भरावे लागतील, असे ते म्हणाले. दरम्यान, आधीच थकबाकीदार शेतकरी अडीच लाखांची रक्‍कम कुठून आणणार असे विचारले असता त्यांनी या प्रश्‍नाचे उत्तर टाळले.