बुद्धिझम ही भारताने जगाला दिलेली देणगी - महिंद राजपक्षे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - 'बुद्धिझम ही भारताने जगाला दिलेली भेट असून, जगातील सर्वश्रेष्ठ बुद्ध धम्माचा श्रीलंकेत प्रसार झाला आहे. हे बुद्धांचे देणे सम्राट अशोकाने श्रीलंकेत आणले. म्हणूनच बुद्धांच्या या भारतभूमीत नतमस्तक झाल्याशिवाय राहावत नाही. येत्या काळात भारत आणि श्रीलंकेचे हे धम्माचे नाते अधिक घट्ट होईल,'' असा आशावाद श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्षे यांनी व्यक्त केला.

धम्मयान एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि पर्यटन विभागातर्फे आयोजित "इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप 2017' इंटरनॅशनल परिषदेचे उद्‌घाटन रविवारी (ता. 29) राजपक्षे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले होते.

राजपक्षे यांनी नमो बुद्धाय, जयभीम म्हणत हिंदीतून भाषणाला सुरवात केली. ते म्हणाले, 'बुद्ध धम्माची श्रीलंकेला सम्राट अशोकामुळे ओळख झाली. भारत-श्रीलंकेत बुद्ध धम्माच्या प्रेमाचे नाते हे पार ऐतिहासिक काळापासून आजही कायम असून, दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. सम्राट अशोकामुळेच जगभर बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार झाला. श्रीलंकेत सर्वाधिक जनता ही बौद्धधर्मीय आहे. एक बौद्ध राष्ट्र म्हणून श्रीलंकेचा गौरव होत आहे. बौद्ध धम्म ही भारताने जगाला दिलेली सर्वोत्तम भेट आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये 17 टक्के जनता ही बौद्धधर्मीय आहे.'' भारतात धम्माला राजाश्रय न मिळाल्यामुळेच बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार खुंटला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.