एमआयएमने केला पुतळा जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

औरंगाबाद - ‘रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा करताना महापौरांनी महापालिकेतील उर्वरित सर्व सदस्यांना सोबत घ्यायला पाहिजे होते. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच ते महापौर झाले आहेत. ज्या पारदर्शक कारभाराचा गवगवा करतात, त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे होते. आम्हाला सोबत घेतले असते तर आम्ही काही त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला नसता,’ अशा शब्दांत शिवसेनेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांनी पत्रकार परिषदेत भावना व्यक्‍त करून तीव्र नाराजी व्यक्त केली. 

औरंगाबाद - ‘रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा करताना महापौरांनी महापालिकेतील उर्वरित सर्व सदस्यांना सोबत घ्यायला पाहिजे होते. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच ते महापौर झाले आहेत. ज्या पारदर्शक कारभाराचा गवगवा करतात, त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे होते. आम्हाला सोबत घेतले असते तर आम्ही काही त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला नसता,’ अशा शब्दांत शिवसेनेचे सभागृहनेते गजानन मनगटे यांनी पत्रकार परिषदेत भावना व्यक्‍त करून तीव्र नाराजी व्यक्त केली. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापौर बंगल्यावर निधीची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना श्री. मनगटे पुढे म्हणाले, ‘‘भाजप नेत्यांनाच शहराची काळजी आहे असे नाही; तर ११५ नगरसेवकांनाही आहे; मात्र ते जणू शहराची काळजी यांना एकट्यांनाच आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आम्ही रस्त्यांची यादी मागत आहोत; परंतु महापौर यादी देण्यास तयार नाहीत. सर्वसाधारण सभेत रस्त्यांची यादी मंजूर करूनच ती अंतिम करण्याचा महापौरांनी शब्द दिला आहे, तो त्यांना पाळावा लागणार आहे. परस्पर रस्त्यांची यादी केल्यास आम्ही त्यांना त्यात आवश्‍यक रस्ते घ्यायला लावू. निविदा प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहोत. विचित्र अटी टाकून कुणाच्यातरी पदरात ही कामे टाकण्याचा डाव असेल, तो उधळून लावू, असा इशारा देत आयुक्तांकडून या रस्त्यांसाठी सक्षम अधिकारी नेमला जावा, अशी मागणी केली. 

हाच का पारदर्शक कारभार? - उपमहापौर
उपमहापौर स्मिता घोगरे म्हणाल्या, १०० कोटी रुपये आले आहेत ही आनंदाची बाब आहे. ही शहरासाठी चांगली गोष्ट आहे; परंतु सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्‍यक होते; मात्र तसे झाले नाही, अशा पद्धतीचा कारभार करण्याला पारदर्शकता म्हणतात काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. 

महापौरांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
महापौरांनी विश्वासात न घेतल्याने एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोजखान संतापले. त्यांनी तत्काळ महापौर घडमोडे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी पोलिस परवानगी मिळवली. पुतळा आणला; पण एमआयएमचे नगरसेवक जमा होण्याची चिन्हे दिसत नव्हती. एमआयएमचे गटनेता, नगरसेवक महापालिकेत होते, त्यांनीही हळूहळू काढता पाय घेतला. शेवटी सय्यद मतीन हे एकमेव मदतीला धावून आले. घोषणाबाजी सुरू झाली, पुतळ्यावर एका कार्यकर्त्याने बाटलीतील पेट्रोल ओतले. पुतळ्याची खेचाखेची सुरू झाली. माचीस आणा, माचीस असा पुकाराही झाला; पण माचीस कुणाकडेही नव्हती; पण दोन उत्साही कार्यकर्ते माचीस घेऊन पुढे आले; पण त्यांनाही इशारा करून पळवून लावण्यात आले आणि ओढाओढीनंतर पोलिसांनी पुतळा काढून घेतला. 

१०० कोटी निधीवर प्रतिक्रिया 
घोषणा युतीच्या नेत्यांनी करणे अपेक्षित : त्र्यंबक तुपे (माजी महापौर) 
शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळाला त्याचा आनंदच आहे. पण एवढ्या मोठ्या निर्णयाची घोषणा करताना ती फक्त भाजपनेच नाही तर युतीच्या नेत्यांनी करायला हवी होती. महापौर हा एकट्या भाजपचा नाही तर तो युतीचा आणि संपूर्ण शहराचा असतो. त्यामुळे निधी मिळाल्याची घोषणा करताना केवळ शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांना विश्‍वासात घेऊन करायला हवी होती, अशी अपेक्षा शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी व्यक्त केली. १५० कोटींचा प्रस्ताव असताना १०० कोटी मिळाले आहेत, त्याचा परिणाम अनेक रस्त्यांच्या कामांना कात्री लावण्यात होणार आहे. भाजपच्या महापौरांनी ज्या रस्त्यांची यादी दिली त्यात नेमके कोणते रस्ते आहेत, कुणाच्या वॉर्डातील आहेत हे गुप्त ठेवण्यात आल्यामुळे संशय बळावतो. महापौरांनी याचा खुलासा करून संशय दूर करावा. 

विश्‍वासात घेतले नाही हा आरोप चुकीचा : भगवान घडामोडे (महापौर) 
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरासाठी निधी मिळाला आहे. स्मार्ट सिटी व रस्त्यांसाठी मिळून जवळपास सव्वाचारशे कोटींचा निधी भाजप सरकारने दिला. सगळ्यांनी त्याचे स्वागत व अभिनंदन केले पाहिजे. हा निधी राज्य सरकारने दिलेला आहे, हा काही महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतला निर्णय नाही. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निधी मिळाल्याची घोषणा केली तर त्यावर एवढी टीका करण्याची व विश्‍वासात घेतले नाही म्हणण्याची गरज नाही. निधी संपूर्ण शहरासाठी आहे, तो काही विशिष्ट वॉर्डासाठी किंवा मतदारसंघासाठी नाही. त्यामुळे मित्रपक्षाने किंवा विरोधकांनी विश्‍वासात घेतले नाही हा केलेला आरोप चुकीचा असल्याचे मत भाजपचे महापौर भगवान घडामोडे यांनी व्यक्त केले.