वानराने घेतली जिल्हा परिषदेची ‘शाळा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

औरंगाबाद - जखमी अवस्थेतील वानर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात घुसल्याने गुरुवारी (ता.२७) सकाळी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. टेबलाखाली बसलेल्या वानराला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही यश आले नाही. शेवटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सकाळी नेहमीप्रमाणे महिला सेविका साफसफाई सुरू करत होती. त्या कामात मग्न असतानाच शालेय पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांच्या दालनात जखमी अवस्थेत एक वानर टेबलाखाली दडून बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वानराला पाहून त्यांनी कार्यालयाबाहेर धावत येत आरडाओरड सुरू केली. त्यामुळे अन्य विभागांतील कर्मचारी जमा झाले. त्यांनी वानराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ते जखमी असल्याचे लक्षात आल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली.

तब्बल दोन तासांनंतर दोन वनरक्षक व दोन मजूर जिल्हा परिषदेत पोचले. त्यांच्याकडे माकडाला पकडण्यासाठी कोणतेही साहित्य नव्हते. त्यामुळे एक पोते मागवून वानराला पकडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते जागा सोडायला तयार नव्हते. शेवटी माकडाच्या आवडीचे फळ केळी मागवण्यात आली. शोधाशोध करून केळी मिळाली नाही. त्यानंतर सफरचंदाची लालसा दाखवून माकडाला पकडण्यात आले. खडकेश्वर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार केल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी त्याला घेऊन गेले.