महापालिकेला बसणार ५० लाखांचा फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

अधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार; एकाने टाकले पाईप, दुसऱ्याने केली काढण्याची शिफारस

अधिकाऱ्यांचा तुघलकी कारभार; एकाने टाकले पाईप, दुसऱ्याने केली काढण्याची शिफारस
औरंगाबाद - तत्कालीन प्रभारी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी हुकूम सोडला आणि भूमिगत गटार योजनेचे प्रकल्पप्रमुख अफसर सिद्दीकी यांनी हुजूर हुकुमाची पूर्ण पूर्तता म्हणत नूर कॉलनीतील नाल्यात १२०० मिलिमीटर व्यासाचे पाईप टाकले. अतिशय चुकीच्या पद्धतीने ही पाइपलाइन टाकल्याने परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून त्यांचा संसार पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे दुसऱ्या अधिकाऱ्याने याची पाहणी करून ही अतिशय चुकीच्या पद्धतीने लाईन टाकल्याचे सांगत ती काढून टाकण्याची शिफारस केली आहे. त्याला आयुक्‍तांनीही मान्यता दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या या तुघलकी कारभारामुळे महापालिकेला ५० लाख रुपयांचा फटका बसणार आहे. 

नूर कॉलनीमध्ये आमखास मैदान, हिमायतबाग परिसर, कमल तलाव, टाऊन हॉल परिसरातून पावसाचे पाणी वाहून येते. हे पाणी टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून बाजूच्या नूर कॉलनीतील नाल्यातून वाहत पुढे नारळीबागेतून बारुदगर नाल्यात जाऊन मिसळते. नूर कॉलनीत गतवर्षी डेंगीमुळे दोन जणांचे मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी आदेश करताच कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी १२०० मिलिमीटर व्यासाची ड्रेनेजचे व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाइपलाइन नाल्यात टाकली. हे पाइप वास्तविक पाहता जमिनीच्या खाली खोल खोदून टाकायला पाहिजे; मात्र पाइप जमिनीच्या काहीसे वर आहेत. 
या भागाचे नगरसेवक गंगाधर ढगे यांनी म्हटले आहे, की ५० लाख रुपये खर्चून टाकण्यात आलेली पाइपलाइन निरुपयोगी ठरली आहे. पाण्याचा निचरा होत नाही आणि पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. दक्षता विभागाने या पुलाची व या भागाची पहाणी करून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, ही पाइपलाइन काढून नाला पूर्ववत करावा लागणार असल्याचा अहवाल आयुक्‍तांना दिला आहे. आयुक्‍तांनी अहवालानुसार पाइपलाइन, मातीचा भराव आणि नाल्यातील अतिक्रमण काढण्याला मान्यता दिली आहे.

या दुबार कामामुळे महापालिकेला ५० लाख रुपयांचा फटका बसणार असल्याचा आरोप केला आहे. 

या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी, पीएमसी आणि कंत्राटदाराकडून हा खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी गंगाधर ढगे यांनी केली आहे.

दुर्गंधीयुक्त पाण्याचा होत नाही निचरा 
नूर कॉलनीच्या वरच्या भागातील म्हणजेच कमल तलावापर्यंत लेवल मॅच करून पाइपलाइन टाकणे गरजेचे असताना तसे करण्यात आले नाही. यामुळे वरच्या भागातून वाहत येणाऱ्या दुर्गंधीयुक्‍त पाण्याचा योग्य निचरा होत नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या मुख्य इमारतीला खेटूनच हा नाला आहे. आधीच चुकीच्या पद्धतीने पाईप टाकण्यात आले आणि त्यात नागरिकांनी पाईपवर मातीचा भराव टाकला आहे.