वसतिगृह नव्हे, हे तर समस्यागृह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

औरंगाबाद - घाण, अस्वच्छता, कोंदट वास अशी स्थिती असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी समस्यागृह बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या विषयी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या; मात्र त्यावर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, आता कुठे प्रशासन कामाला लागले असून स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे.

औरंगाबाद - घाण, अस्वच्छता, कोंदट वास अशी स्थिती असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी समस्यागृह बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या विषयी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या; मात्र त्यावर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, आता कुठे प्रशासन कामाला लागले असून स्वच्छतेची मोहीम राबविली जात आहे.

आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे, डॉक्‍टर किती काळजी घेत असतील, अशी आपली भाबडी समजूत आहे; मात्र प्रत्यक्षात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे धडे गिरवणाऱ्या भावी डॉक्‍टरांना दररोज दुर्गंधीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्नानासाठी, पिण्यासाठी पाणी मागण्याची वेळ आल्याची बाब तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, वॉर्डन यांना कळविण्यात आलेली होती; मात्र त्यांना विद्यार्थ्यांच्या या समस्यांचे कुठलेली सोयरसुतक वाटले नाही. संतापाचा बांध फुटल्याने विद्यार्थ्यांने वॉर्डनच्या पुतळ्याचे दहनही केले होते; मात्र त्यानंतर औपचारिकता म्हणून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन होय फारच समस्या आहेत, लवकरच सोडवू, असे आश्‍वासनही दिले होते. विद्यार्थ्यांनीदेखील अपेक्षा बाळगत वाट पाहिली; मात्र एकही प्रश्‍न सुटला नाही. हा प्रश्‍न काही दिवसांपूर्वी पुन्हा नव्याने मांडण्यात आला. त्यानंतर आता कुठे साफसफाई सुरू झाली आहे. 
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत न घेताच प्रशासनातर्फे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास असे नियोजन करून कर्मचाऱ्यांकडून येथील कामे करून घेतली जात आहेत. खूप दिवसांनंतर कामाला सुरवात झाल्याने विद्यार्थ्यांनीदेखील आनंद व्यक्‍त केला आहे.
 

उघड्या खिडक्‍यांतून साप येतात
विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात २३५ खोल्या असून जमिनीलगतच्या बहुतांश खोल्यांच्या जाळ्या तुटल्याने केवळ मच्छरच नव्हे तर सापदेखील येतात, अशी धक्‍कादायक माहिती एका विद्यार्थ्याने सांगितली. तसेच सकाळी नऊनंतर पाणी संपलेले असते. त्यामुळे सकाळीच सर्व कामे उरकून घ्यावे लागतात. दुपारी वसतिगृहात आले तर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते. येथील असल्या समस्यांमुळे घरच्या मंडळींना भेटण्यास येऊ द्यायला लाज वाटते, असा खेदही व्यक्‍त केला.