अतिक्रमण हटविण्यासाठी ‘नोटीस पे नोटीस’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग केवळ नोटिसा देण्याचे काम करीत असून, आम्हाला सभागृहात येऊन अडीच वर्षे झाली; मात्र अद्याप एकही कारवाई होत नाही. ‘नोटीस पे नोटीस’ हा प्रकार किती दिवस चालणार असा सवाल महापालिकेच्या मंगळवारी (ता.१९) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. 

औरंगाबाद - महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग केवळ नोटिसा देण्याचे काम करीत असून, आम्हाला सभागृहात येऊन अडीच वर्षे झाली; मात्र अद्याप एकही कारवाई होत नाही. ‘नोटीस पे नोटीस’ हा प्रकार किती दिवस चालणार असा सवाल महापालिकेच्या मंगळवारी (ता.१९) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. 

जयभवानीनगर येथील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांचा विषय नगरसेविका मनीषा मुंडे गेल्या अनेक दिवसांपासून मांडत आहेत; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. मंगळवारच्या सभेत हा विषय त्यांनी पुन्हा एकदा मांडला. त्यावर खुलासा करताना शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी जयभवानीनगरातील नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, सर्व विभागांची आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्यात इतर नगरसेवकांनीदेखील हस्तक्षेप केला. त्र्यंबक तुपे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने धार्मिक स्थळांवर तातडीने कारवाई केली. नाल्यावरील अतिक्रमणांसाठीही न्यायालयात जायचे का? असा प्रश्‍न केला. या अतिक्रमणांना प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप राज वानखेडे यांनी केला. प्रमोद राठोड यांनी प्रशासनाचा नेमका प्लॅन काय? अशी विचारणा केली. शेख जफर यांनी नाल्यावर स्लॅब टाकल्याची तक्रार केली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. अशीच तक्रार विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी केली. अतिक्रमण हटाव विभाग नोटिसा देऊन मोकळा होतो. किती दिवस ‘नोटीस पे नोटीस’ हा प्रकार चालणार आहे? आम्ही निवडून आल्यापासून तक्रारी करीत आहोत; मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

चुकीच्या नोटिसीची चौकशी 
नगरसेवक जमीर कादरी यांनी माझे कार्यालय नसतानादेखील अतिक्रमण केल्याची नोटीस बजाविण्यात आली होती. अधिकारी असे काम कोणाच्या सांगण्यावरून करतात, असा सवाल केला. नंदकुमार घोडेले यांनी हा प्रकार गंभीर असून, चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी आयुक्तांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.