पाच दिवसांत पेट्रोल अडीच रुपयांनी स्वस्त

आदित्य वाघमारे
बुधवार, 21 जून 2017

डिझेलचा भाव दोन रुपयांनी कमी; रोज दर बदलाचा निर्णय नागरिकांच्या पथ्यावर
औरंगाबाद - प्रत्येक चोवीस तासांनी इंधन किमतीच्या बदलाचा निर्णय नागरिकांच्या पथ्यावर पडला आहे. शुक्रवारपासून (ता. 16) रोज होणाऱ्या या बदलांमुळे पाच दिवसांत पेट्रोल अडीच; तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे.

डिझेलचा भाव दोन रुपयांनी कमी; रोज दर बदलाचा निर्णय नागरिकांच्या पथ्यावर
औरंगाबाद - प्रत्येक चोवीस तासांनी इंधन किमतीच्या बदलाचा निर्णय नागरिकांच्या पथ्यावर पडला आहे. शुक्रवारपासून (ता. 16) रोज होणाऱ्या या बदलांमुळे पाच दिवसांत पेट्रोल अडीच; तर डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे.

दर पंधरा दिवसांनी घेतल्या जाणाऱ्या आढाव्यानंतर देशभरातील इंधनाच्या दरांमध्ये घट किंवा वाढ होत असे; पण आता हे धोरण बदलण्यात आले असून, दर दिवसाला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केला जात आहे. शुक्रवारपासून हे नवे धोरण लागू झाले, त्यानंतर सकाळी सहाला दरांमध्ये रोज बदल केला जात आहे. हा बदल पेट्रोल पंप चालकांच्या कमी आणि नागरिकांच्या अधिक पथ्यावर पडला आहे. सध्या इंधनाच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत असून, पाच दिवसांत पेट्रोलमध्ये लिटरमागे दोन रुपये 41 पैशांची घट झाली आहे.

सोळा तारखेला 78.13 रुपयांनी विकल्या गेलेल्या पेट्रोलचे भाव मंगळवारी (ता. 20) 75.72 रुपये प्रति लिटरवर आले आहेत. डिझेलच्या दरांमध्ये पेट्रोलच्या तुलनेने कमी घसरण झाली असल्याचे समोर आले. रोज दर बदल करण्याचे धोरण अवलंबण्यात आले, तेव्हा शहरातील डिझेलचा भाव हा 62.11 रुपये प्रतिलिटर होता. हा भाव गेल्या पाच दिवसांत घसरला असून, तो आता 60.03 रुपये प्रतिलिटरवर आला आहे. त्यामुळे नागरिकांना या नव्या धोरणाचा काहीसा दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. औरंगाबादेतील वाहनांची संख्या सहा लाखांच्या घरात गेली आहे. शहरवासीयांना दिवसाकाठी सुमारे तीन लाख लिटर डिझेल, तर दोन लाख लिटर पेट्रोल लागते.

वितरकांचे "वेट ऍण्ड वॉच'
शासनाचा हा निर्णय इंधनविक्री करणाऱ्या वितरकांसाठी सध्या चिंतनाचा विषय बनला आहे. वितरकांना ज्या दरात इंधन खरेदी करावे लागते, त्याच्या तुलनेने सध्या स्वस्तात इंधन विक्री करावी लागत आहे, अशी माहिती बुर्जिन प्रिंटर यांनी "सकाळ'ला दिली. सरकारने यापूर्वी जी आश्वासने दिली आहेत, त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते ते पाहणे गरजेचे आहे. सध्या या दर बदलांच्या माध्यमातून किती नफा आणि तोटा होतो याची आकडेमोड करण्याचे काम पंपांवर सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या याविषयी "वेट ऍण्ड वॉच' असेच धोरण स्वीकारले असल्याचे ते म्हणाले.

ज्यांचे पंप 24 तास सुरू आहेत त्यांना नाही; पण ठरावीक वेळांमध्ये पंप चालणाऱ्यांची सध्या कसरत सुरू आहे. पंपचालकांना वेळेवर दर मिळत नसल्याने त्यांना त्रास होतो आहे. या नव्या धोरणांचा धंद्यावर काय परिणाम होतो, याची चाचपणी सध्या सुरू आहे. आगामी काळात बैठकीच्या माध्यमातून याबाबत पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
- अखिल अब्बास, सचिव, औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशन.