...अखेर बॅंकेने केले पोस्टाचे खाते पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सेवा सुरळीत - टपाल कार्यालयात सोमवारी सुरू झाले चेकचे व्यवहार

औरंगाबाद - स्टेट बॅंकेच्या विलीनीकरणानंतर भारतीय टपाल खात्याच्या येथील कार्यालयाचे महिनाभरापासून बंद असलेले चेकचे व्यवहार सोमवारी (ता. ११) पूर्ववत झाले. शहागंज येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत टपालाचे ५८३ चेक बाऊन्स झाल्याचे, तर महिनाभरापासून चेकचे व्यवहार ठप्प झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. आठ) दिले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या बॅंक प्रशासनाने टपालाचे लॉक केलेले खाते पूर्ववत सुरू केले. 

स्टेट बॅंकेच्या सहयोगी बॅंकांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियात विलीनीकरण झाले. त्यानंतर शहागंज येथील येथील स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या शाखेचे रूपांतर स्टेट बॅंक ऑफ इंडियात झाले. मात्र, यामध्ये भारतीय टपाल खात्याचे खाते लॉक झाले होते. यानंतर टपाल विभागाने दिलेले ५८३ चेक बाऊन्स झाले होते. चेक बाऊन्सची संख्या वाढत गेल्याने टपाल विभागाला तब्बल महिनाभर चेकचे व्यवहार बंद ठेवावे लागले. यामध्ये हजारो चेक टपाल विभागात तुंबले होते. तर दुसरीकडे ग्राहकांनी त्यांच्या पैशांसाठी तगादा लावला होता. 

ज्या ग्राहकांचे टपालात बचत खाते, मासिक प्राप्ती योजना, आवर्ती खाते, किसान विकासपत्र, राष्ट्रीय बचत पत्र खाते, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, सिनिअर सिटीजन्स, पब्लिक प्रॉव्हिडंड फंड खाते आहे; तसेच ज्या खात्यांची मॅच्युरिटी पूर्ण झाली अशा ग्राहकांना त्यांची रक्कम परत करताना टपाल खाते चेक देते. २० हजारांच्या पुढे रक्कम असेल तर प्रत्येक ग्राहकाला रोख रक्कम न देता चेकच दिला जातो. 

मात्र, हे चेक ‘ऑदर रिझन’ दाखवून बाऊन्स करण्यात आले. आता सर्व ग्राहकांना चेक देण्यास सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय टपाल खात्याची कोणतीही चूक नसतांना बॅंकेच्या हलगर्जीपणाचा फटका अनेक ग्राहकांना सहन करावा लागला आहे. आता ‘सकाळ’च्या वृत्तानंतर टपाल विभागाचे खाते बॅंकेने पूर्ववत सुरू केले आहे.