मॉन्सूनपूर्व पॅचवर्कचा दीड महिन्यानंतर प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

महापालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे

औरंगाबाद - पावसाळ्याचा तब्बल दीड महिना उलटल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी (मॉन्सूनपूर्व पॅचवर्क) ४९ लाख ९५ हजार रुपयांचा प्रस्ताव बुधवारी (ता. १९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला आहे.

महापालिका प्रशासनाचे वरातीमागून घोडे

औरंगाबाद - पावसाळ्याचा तब्बल दीड महिना उलटल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी (मॉन्सूनपूर्व पॅचवर्क) ४९ लाख ९५ हजार रुपयांचा प्रस्ताव बुधवारी (ता. १९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला आहे.

शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांत जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. त्यात भूमिगत गटार योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची कामे अद्याप करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांची ओरड सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, असे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले होते. मात्र, दप्तर दिरंगाईमुळे प्रस्ताव दीड-दीड महिना उशिराने येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात वॉर्ड क्रमांक ७२ ते ७६ व १००, १०१ येथे पॅचवर्क करण्यासाठी ४९ लाख ९५ हजार ४४१ रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यात मॉन्सूनपूर्व पॅचवर्क असा उल्लेख करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला आहे. त्यामुळे आता पॅचवर्कसाठी प्रशासनाला पावसाळा उलटण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

तीन कोटी ३३ लाखांचे प्रस्ताव 
स्थायी समितीच्या बैठकीसमोर एक कोटीच्या अंदाजपत्रकांचे तर दोन कोटींच्या निविदांचे असे तीन कोटी ३३ लाखांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्याशिवाय सभागृह आणि अभ्यासिका भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे. 

तीन बडतर्फ कर्मचाऱ्यांचे अपील 
सेवेतून बडतर्फ केलेल्या दोन व सेवा समाप्त केलेल्या एक अशा एकूण तीन कर्मचाऱ्यांच्या अपिलांवर निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. मालमत्ता विभागातील मजूर विजय मल्हारी अंभोरे याने तसेच वॉर्ड कार्यालय ‘ड’ येथे सेवेत असलेल्या सेविका कमल विजय अंभोरे या महिलेने खोटी कागदपत्रे सादर करुन प्रशासनाची फसवणूक केली होती. त्यामुळे या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच वॉर्ड कार्यालय क्रमांक पाचमध्ये सफाई मजूर असलेल्या जगन संभाजी बनसोडे याची लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती झालेली होती. मात्र, त्याविषयी मनपाकडे आक्षेप दाखल झाल्यानंतर चौकशी होऊन त्याची सेवा समाप्त करण्यात आलेली होती. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्याला पुन्हा मनपा सेवेत घेण्यात यावे यासाठी सभापतींकडे अपील सादर केलेले आहे.