मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्‍त केला. मात्र, नेहमीप्रमाणे मराठवाड्यात हे अंदाज खोटे ठरले आहेत. दोन महिन्यांत सरासरी 71 टक्‍के पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात जूनच्या सुरवातीलाच दमदार पावसाने सलामी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी वेगाने पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, पावसाने दगा देण्यास सुरवात करताच शेतकऱ्यांना धडकी भरली. आज, उद्या म्हणता म्हणता दोन महिने उलटत असतानाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. विभागीय आयुक्त कार्यालयातून उपलब्ध माहितीनुसार, जुलै महिन्यात तीस दिवसांत केवळ नऊ दिवस पावसाची नोंद झाली. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या मराठवाड्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. जलसाठ्यात पाणी साठले होते. मात्र, यंदा मराठवाड्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरण परिसरात झालेल्या पावसामुळे 50 टक्‍क्‍यांपर्यंत पोचत आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांत सरासरी पावसाची नोंद
जिल्हा : टक्केवारी

औरंगाबाद- 70.5
जालना- 70
परभणी- 54.6
हिंगोली- 64.2
नांदेड- 60.7
बीड- 80.1
लातूर- 82.9
उस्मानाबाद- 93.1

एकूण. 71

Web Title: aurangabad marathwada news rain