घराघरांत पाणी, रस्त्यांवर घाण तळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या ढिसाळ प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. गुरुवारी (ता. २१) दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस पडला असला, तरी रस्तोरस्ती घाण पाण्याची तळी साचली, ड्रेनेज उचंबळून आले आणि अनेक ठिकाणी लोकांच्या घरांत पाणी घुसून नासाडी झाली.

औरंगाबाद - गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या ढिसाळ प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. गुरुवारी (ता. २१) दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस पडला असला, तरी रस्तोरस्ती घाण पाण्याची तळी साचली, ड्रेनेज उचंबळून आले आणि अनेक ठिकाणी लोकांच्या घरांत पाणी घुसून नासाडी झाली.

गेले तीन दिवस शहरात पावसाळी कुंद वातावरण कायम आहे. मुसळधार पाऊस तासन्‌तास पडण्याचे दृष्य अनेक वर्षांनंतर पाहणाऱ्या औरंगाबाद शहरात नागरिकांना या पावसाचा आनंद मात्र लुटता आलेला नाही. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जलनिस्सारण योजना निकामी ठरली. रस्तोरस्ती पाणी साचल्याने मोठाली तळी तयार झाली. पाण्याला उतार न मिळाल्यामुळे अनेक घरांमध्ये घाण पाणी शिरून नुकसान झाले. चिकलठाणा वेधशाळेत दिवसभरात एकूण २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर एमजीएम हवामान केंद्रातील पर्जन्यमापकात १६.५१ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. काही भागांमध्ये सकाळी, अनेक ठिकाणी दुपारी पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हा पाऊस आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

जालना रोडवर पाण्याचा निचरा होत नसल्याने उच्च न्यायालयासमोर सुमारे दुपारी दीड फूट पाणी साचले होते. याशिवाय सखल भागांमध्ये असणारे रस्ते आणि मैदाने पाण्याने डबडब भरली होती. साताऱ्यातून वाहणारा नाला भरून पुलावरून पाणी वाहिले. शहरातील सरस्वती भुवन बसस्टॉपसमोर, टाऊन हॉल चौकात उड्डाणपुलाखाली, औरंगपुऱ्यातील भाजी मंडई भागात, समर्थनगरच्या सावरकर चौकात, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाजवळ, खोकडपुरा- बंजारा कॉलनी रस्त्यावर, एमजीएम चौकात पावसाचे पाणी साचले होते. बारुदगर नाला, लोटाकारंजा, बायजीपुरा, समतानगर, भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंप, पंचवटी चौकातही रस्ते तुंबले होते. महावीर चौकातील उड्डाण पुलाच्या पदमपुऱ्याकडील टोकाला पाणी साचल्यामुळे अवजड वाहने अडकून ट्रॅफिक जाम झाली. कर्णपुऱ्यात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीची वाहतूक कोंडीत भर पडली. गजानन महाराज मंदिर, मुकुंदवाडी, हेडगेवार रुग्णालय परिसरातील रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.

लेणी रस्ता खड्ड्यात
बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्त्याचे डांबरीकरण करून वर्षही पूर्ण झाले नाही; मात्र या जेमतेम दीड किलोमीटरच्या रस्त्यात शेकडो लहानमोठे खड्डे झाले आहेत. यात पाणी साचल्यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यटकांचे हाल होत आहेत. कंत्राटदाराने दर्जाहीन रस्ता बनविल्यामुळे आणि प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केल्यामुळेच दुरवस्था झाल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत.

भाजप कार्यालयात घुसले पाणी
उस्मानपुऱ्यातील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयाच्या तळमजल्यात पावसाचे पाणी घुसले. विशेष म्हणजे या वेळी वरच्या हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. पाणी घुसल्याचे दिसताच तेथे उपस्थित असलेल्या आमदार अतुल सावे यांनी अग्निशमन विभागात फोन लावला. त्यानंतर जवानांनी येऊन पाणी काढले.

उस्मानपुरा, भावसिंगपुरा, चिकलठाणा मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील सर्व ६५ महसूल मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस पडल्याची नोंद झाली. औरंगाबाद तालुक्‍यात उस्मानपुरा, भावसिंगपुरा, वरुडकाझी, चिकलठाणा तर वैजापूर तालुक्‍यातील महालगाव, लाडगाव, लासूरगाव, नागमठाणा, तर गंगापूर तालुक्‍यातील गंगापूर व सिद्धनाथ वडगाव या १० मंडळांत अतिवृष्टी झाली. सोयगाव तालुक्‍यातील काळदरी भागातही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पिकांचे या पावसाने नुकसान झाले आहे.

अतिवृष्टी झालेली मंडळे (पाऊस मिमीमध्ये) 
 उस्मानपूरा    ७१ 
 भावसिंगपुरा    ७८ 
 वरूडकाझी    ७८ 
 चिकलठाणा    ६५ 
 महालगाव    ११० 
 लाडगाव    ९२ 
 लासूरगाव    ७१ 
 नागमठाण    ६६ 
 गंगापूर    ६५ 
 सिद्धनाथ वडगाव    ७०