दोनशे रुपयांत करा रूट कॅनॉल ट्रीटमेंट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

महापािलकेची सिडको एन-आठमध्ये सुविधा; प्रशासनाचा दरनिश्‍चितीचा प्रस्ताव

औरंगाबाद - महापालिकेने नागरिकांना आता दातांच्या उपचारांची सुविधाही उपलब्ध करून दिली असून, केवळ दोनशे रुपयांत रूट कॅनॉल ट्रीटमेंट होणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी (ता.१९) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला आहे. सिडको एन-आठ येथील रुग्णालयात दात काढण्यापासून चांदी भरणे, पल्प कॅपिंग, स्केलिंगसह इतरही उपचार मिळणार आहेत. 

शहरातील महापालिकेची ३१ आरोग्य केंद्रे असून, त्यात बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागाची सुविधा आहे. अनेक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याणसह इतर शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यात आता दातांच्या विविध उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने महापालिकेच्या सिडको एन-आठ येथील रुग्णालयात हे उपचार मिळणार आहेत. परंतु महापालिकेने दंतरोग उपचाराच्या सेवांचे दर ठरविलेले नाहीत. हे दर ठरविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर ठेवला आहे. शासनाच्या आरोग्य विभागाने २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय दंत रुग्णालयातील सेवांचे दर ठरविलेले आहेत. त्याच दरांचा आधार घेऊन महापालिकेने दर प्रस्तावित केले आहेत. खासगी रुग्णालयात रूट कॅनॉल ट्रीटमेंटसाठी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयामध्ये आता केवळ दोनशे रुपयांमध्ये हे उपचार उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. 

यांना मिळणार मोफत उपचार 
दातांच्या विविध उपचारांसंदर्भात दरनिश्‍चितीचा हा प्रस्ताव असला तरी काही घटकांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत. त्यात महापालिका कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय, शासकीय रुग्णालयातील परिचर्या कर्मचारीवर्ग, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, न्यायाधीशांच्या आदेशाने स्थानबद्ध व्यक्‍ती, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व त्यांचे कुटुंबीय, सुधारगृहातील रुग्ण, बेवारस मुले, आश्रमशाळेतील रुग्ण, महापौर, पदाधिकारी, नगरसेवक, न्यायाधीश, ज्येष्ठ नागरिक यांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे. 

प्रस्तावित दर
बाह्य नोंदणी     दहा रुपये
स्केलिंग व पॉलिशिंग     ५० रुपये
दातांची क्ष-किरण तपासणी     २५ रुपये
चांदी भरणे     ६० रुपये
सिमेंट भरणे     ३० रुपये
रूट कॅनॉल ट्रीटमेंट      २०० रुपये
पल्प कॅपिंग     १०० रुपये
लाईट क्‍युअर रेस्टोरेशन     १०० रुपये
दात काढणे     ३० रुपये