‘फिजेट स्पिनर’मुळे सुरक्षेचा गेम

संदीप लांडगे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

ऑनलाइन खेळांपाठोपाठ आता आधुनिक खेळणीही झाली जीवघेणी

औरंगाबाद - सध्या जगभर ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमची चर्चा होत आहे; पण आता या गेमपाठोपाठ ‘फिजेट स्पिनर’ नावाचा आणखी एक खेळ दाखल झाला असून, विशेष म्हणजे तो संगणक किंवा मोबाईलमध्ये नाही, तर एक धारदार खेळणे बोटांमध्ये घालून तो प्रत्यक्षात खेळावा लागतो. शहरातील अनेक महाविद्यालयीन युवकांसह शाळकरी मुलांना या खेळाने भुरळ घातली आहे. हा खेळ खेळताना शरीरावर जखमा होण्याचा धोका आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

काही महिन्यांपासून धोकादायक डिजिटल गेमचा मुद्दा कळीचा बनला आहे. त्यात ब्लू व्हेल, पोकेमॉन यांसह इतर खेळांचा समावेश आहे. त्यातच भर म्हणून आता शहरात ‘फिजेट स्पिनर’ची क्रेज वाढत आहे. हा खेळ प्रत्यक्षात खेळावा लागतो. त्याचे खेळणे विविध धातू आणि प्लास्टिकपासून वेगवेगळ्या आकारांत बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्यावर मुलांची बोटे अडकतील अशा बेअरिंग लावलेल्या आहेत. बाजूला चाकूच्या आकारांचे धारधार पाते आहे.

त्यामुळे हा खेळ खेळताना थोडी जरी चूक झाली तर या पात्यांमध्ये बोट अडकून खोलवर जखमी होण्याचा धोका आहे. अनेक मुलं पैज लावून हा खेळ खेळत आहेत. हे खेळणे पन्नास रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंत सहजतेने मिळत आहे. शिवाय ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरही त्याची विक्री होत आहे.

कसे खेळतात हे खेळणे?  
खेळण्याच्या मध्यभागी किंवा तीनही बाजूला छोट्या बेअरिंग वर बसविलेल्या असतात. त्याला फिरणारी तीन किंवा चार पाती असतात. त्या पात्यांना तलवार, चाकूप्रमाणे टोकदार आकार दिलेला असतो. ते साधन हाताने फिरवून ते वेगवेगळ्या बोटांवर घेता येते. जमिनीवरही फिरविता येते. एकाच वेळी तीन ते चार स्पिनर एकत्र करूनही काही मुले फिरवितात. कोणाचे खेळणे जास्त वेळ फिरते यावर मुलांची स्पर्धा लागलेली असते. काही चॅलेंजिंग स्पिनरला तलवार किंवा चाकूसारखी धार असते. ते व्यवस्थित फिरविले तर ठीक नाहीतर बोटाला जखम होते.  

स्वमग्न मुलांसाठी
स्वमग्न असणाऱ्या मुलांमध्ये एकाग्रता वाढावी, या दृष्टिकोनातून हे फिजेट स्पिनर खेळणे सुरवातीला तयार करण्यात आले होते. मात्र, कालांतराने असे लक्षात आले, की या खेळण्याचा अतिवापर हा मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढविणारा ठरत आहे. शिवाय यामुळे शरीरावर जखमाही होत आहेत.