पेपर तपासणी नाकारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार - डॉ. राजेश रगडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल २०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत आहे. अनेक शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी दिली.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे मार्च-एप्रिल २०१७ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल लावण्यास विलंब होत आहे. अनेक शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी दिली.

विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यास वेळ लागला आहे. हे मान्य केले असून, त्या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार ज्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका मूल्यांकनास सहकार्य केले नाही किंवा मूल्यांकनासाठी हजर झाले नाहीत, अशा शिक्षकांविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४८ पोटकलम (४) अन्वये कार्यवाही करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मूल्यांकनास सहकार्य केले नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ. रगडे यांनी सांगितले.

पदवी परीक्षेत मूल्यांकन केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने मार्कलिस्टची डेटा एंट्री करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. मात्र, निकाल घोषित करताना, डेटा एंट्री करताना अनेक चुका झाल्याचे निदर्शनास येत आहेत.

त्यामुळे निकाल घोषित करण्यास उशीर होत आहे. परीक्षा विभागात त्या चुका पुन्हा दुरुस्त कराव्या लागल्या. त्यामुळे परीक्षा कामात ढिलाई करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे निकाल संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षक मूल्यांकनासाठी वेळेत न आल्याने व मूल्यांकनासाठी सर्वांचे अत्यल्प सहकार्य मिळाल्याने निकाल घोषित करण्यास वेळ लागला आहे.
 

परीक्षा विभागाचे काम जोरात
परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून आधी अडचणीच निकाली काढल्या. निकालाचे काम वेळेत होण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने १२७ अभ्यासक्रमांच्या परीक्षापैकी ९५ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल घोषित केले आहेत. उर्वरित निकाल लवकरच घोषित होतील, असे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. राजेश रगडे यांनी सांगितले.