आंतरजिल्हा बदलीनंतरही शिक्षकांना मिळेना समाधान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

औरंगाबाद - आंतरजिल्हा बदलीने १५९ शिक्षकांची जिल्ह्यात नियुक्ती झाली. यापैकी सुमारे ४० जोडप्यांना एकत्रित बदली देण्याऐवजी वेगवेगळ्या तालुक्‍यांत नियुक्ती देण्यात आवली आहे. पती वैजापुरात, तर पत्नीची सोयगाव तालुक्‍यात अशा बदल्या करण्यात आल्याने आपल्या जिल्ह्यात येऊनही पती-पत्नीला दूरच्या ठिकाणी राहून सेवा बजावावी लागणार आहे. या संदर्भात बुधवारी (ता. १९) या शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. अध्यक्षांनी यातून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. 

जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी बदल्या हा कायम जिव्हाळ्याचा विषय. काही वर्षे बाहेरच्या जिल्ह्यात सेवा बजाविल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या १५९ शिक्षकांना मंगळवारी (ता. १८) रात्री अकराला नेमणुका देण्यात आल्या. रात्री दहापर्यंत समुपदेशन करण्यात आले. मात्र, नाव समुपदेशनाचे नियुक्‍त्या मात्र अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या मनावर अशी परिस्थिती असल्याचे नेमणुकांनंतर चित्र स्पष्ट झाले. पती-पत्नी दोघांना सोयिस्कर ठरेल अशा ठिकाणी नेमणुका द्याव्यात, अशी नियमात तरतूद आहे; मात्र या नेमणुका देताना या तरतुदीला हरताळ फासल्याचा आरोप शिक्षक दांपत्यांनी केला आहे. जोडप्यांपैकी बहुतांश शिक्षिकांना सोयगाव तालुका देण्यात आला आहे, तर शिक्षकांना पैठण, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री तालुक्‍यांत नेमणुका दिल्या आहेत. एका शिक्षिकेने व्यथा मांडताना सांगितले, की शिक्षिकेच्या चार-साडेचार वर्षांच्या मुलीचे दररोज रक्‍त बदलावे लागते. यासाठी शहरापासून जवळ असलेली शाळा देण्याची मागणी केली होती. मात्र, नेमणूक सोयगाव तालुक्‍यात मिळाली आहे. 

मार्ग काढण्याचे आश्‍वासन
शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसल्याने बुधवारी या शिक्षक-शिक्षिकांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या. श्रीमती डोणगावकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन यातून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.