घरगुती सजावटीच्या थर्माकोलला जीएसटीचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

किमतीमध्ये वाढ - पूर्वी होता केवळ पाच टक्के, आता २८ टक्के कर

औरंगाबाद - घरगुती गणपतीची सजावट करण्यासाठी थर्माकोलला मोठी मागणी असते. थर्माकोलचा व्यवसाय करणारे दरवर्षी पाच टक्के कर भरत होते. मात्र, यंदा थर्माकोलवर २८ टक्के जीएसटी भरावा लागत असल्याने दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती सजावटीसाठी उपलब्ध असणाऱ्या थर्माकोल मंदिराचे दर चारशे ते चार हजारापर्यंत झाले आहेत.

दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणाला थर्माकोलच्या मंदिरांची मागणी असते. गणपती अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने थर्माकोलच्या मंदिरांनी बाजारपेठ सजली आहे. कारागीर गेल्या महिन्यापासून गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य तसेच थर्माकोलची विविध आकारातील मंदिरे तयार करत आहेत. गेल्या महिन्यापासून मंदिरे बनवण्याच्या कामात कारागीर मग्न आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार मंदिरे तयार केली जातात. गजानन मंदिर, कॅनॉट प्लेस, सेव्हन हिल, टीव्ही सेंटर, गुलमंडी, येथे विविध प्रकारची मंदिरे विक्रीसाठी ठेवलेली आहेत. 

मागील वर्षी मंदिरांची किंमत दोनशेपासून ते तीन हजारांपर्यंत होती. मात्र, यंदा जीएसटीमुळे दरात वाढ झालेली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार यंदा बाहुबली, बालाजी आदी स्वरूपात मंदिरे तयार करण्यात आली आहेत. वॉटर फाउंटन्स थर्माकोलला अधिक मागणी आहे. थर्माकोल मंदिर एकदा खरेदी केल्यांतर दोन ते चार वर्षे पुन्हा पुन्हा वापरता येते. थर्माकोल मंदिर खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. आकर्षक मंदिरामुळे ग्राहकांना सजावटीसाठी अधिक वेळ लागत नाही. विविध रंगांमध्ये मंदिर उपलब्ध असल्याने लक्ष वेधून घेतात.

थर्माकोल मंदिरांना दरवर्षी मोठी मागणी असते. घरगुती गणपती सजावटीसाठी थर्माकोल मंदिर जास्त आकर्षक वाटते. सजावटीचा वेळ वाचतो. यंदा दुष्काळी वातावरण आहे. त्यातच जीएसटीने थर्माकोलचे भाव वाढल्यामुळे मंदिराच्या दरातही वाढ झाली आहे. 
- अमोल केसरकर, थर्माकोल मंदिर विक्रेता

Web Title: aurangabad marathwada news thermocol rate increase by GST